दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : महाराष्ट्राच्या वारकरी, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा शतकानुशतके अविभाज्य भाग असणारे आषाढी वारी सोहळा लवकरच विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ होत आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवार, दि.२० रोजी पुण्यनगरी पुण्यात दाखल होत असून या पालख्यांचे स्वागत परंपरेनुसार मोठ्या उत्साहात व्हावे आणि पालखी सोहळ्यातील सहभागी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा उत्तमरित्या व्हावी, या उद्देशाने आज पुणे शहरातील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आणि तयारीचा आढावा केद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी करुन घेतला आणि विविध सूचना प्रशासनाला केल्या.
पालख्यांच्या स्वागतासोबतच वारकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांचा यावेळी आढावा घेत वारकऱ्यांच्या सुरक्षेचे नियोजन, स्वच्छतेची व्यवस्था, आरोग्य यंत्रणांची सज्जता, राहण्याची आणि पार्किंगची व्यवस्था, वाहतूक बदल आणि पालखी मार्गांची वाहतूक व्यवस्था याबाबत विस्तृत माहिती घेत कोणत्याही प्रकारची कमी राहू नये, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या. तसेच संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्याचेही सूचित केले.
पुणे महापालिकेची सुरुवात होते त्या विश्रांतवाडी चौकातून या पाहणी दौऱ्याला सुरुवात करत फुलेनगर विसावा, संगमवाडी चौक, पाटील ईस्टेट चौक, सीओईपी परिसर, श्री निवडुंगा विठोबा मंदिर आणि भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे भेट देत पाहणी केली आणि सविस्तर आढावा घेतला.
यावेळी आमदार हेमंतभाऊ रासने, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार, वाहतूक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्यासह स्थानिक नगरसेवक, भाजपासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



