युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा जागृत नागरीक, शेतकरी भिमराव विठ्ठलराव कुऱ्हाडे यांनी आज (16)पासून लोतवाडा ते कुटासा मुंडगाव शेतरस्त्यासाठी जलत्याग व आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
या शेत रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने शेत रस्ता अरुंद झाला असून त्याचे मोजमाप करुन हद्द कायम करण्यात यावी तो मोकळा करण्यात यावा याबाबतचे पत्र भिमराव कुऱ्हाडे यांनी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तहसिलदार, विभागीय आयुक्त यांना 25 जुलैला दिले होते.
त्यानंतर 8 ऑगस्टला दुसरे पत्र दिले. त्यामध्ये 16 सप्टेंबरला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला असताना त्या गोष्टीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष दिले नाही.
15 सप्टेंबरपर्यंत शासनाने कुठली कारवाई केली नसल्याने आज (दि. 16) रोजी भिमराव कुऱ्हाडे यांनी रस्त्यावर ट्रॅक्टरमध्ये जलत्याग व आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
बॉक्स…
भिमराव कुऱ्हाडे उपोषणास अशा ठिकाणी बसले आहेत की त्या ठिकाणी जाणे सुद्धा कठीण आहे. पावसात शेतरस्त्यावर चिखलात, उपोषण सुरु केले असल्याने आता अधिकारी काय निर्णय घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.



