Home Social वारकरी भाविकांना सुलभ व जलद दर्शनसाठी मंदिर समिती प्रयत्नशील :- सहअध्यक्ष गहिनीनाथ...

वारकरी भाविकांना सुलभ व जलद दर्शनसाठी मंदिर समिती प्रयत्नशील :- सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर — विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत टोकन दर्शन प्रणाली विकसित…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक

पंढरपूर : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद व सुलभ दर्शन व्हावे यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत टोकन दर्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा प्रथम चाचणी शुभारंभ आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती चे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

      यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड.माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, बलभीम पावले, संजय कोकीळ, राजाराम ढगे, शंकर मदने, राजेंद्र घागरे आदी उपस्थित होते.

     गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, मंदिर समिती वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून आवश्यक सोई उपलब्ध करून देत आहे. तसेच वारकरी भाविकांना सुलभ व जलद दर्शन होईल, यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे. या चाचणीमध्ये काही त्रूटी व नव्याने काही सुविधा निर्माण करण्याची गरज भासल्यास, त्याची पूर्तता करण्यात येईल. याशिवाय मुळ दर्शनरांगेतील भाविकांना दर्शनासाठी विलंब होणार नाही, याची देखील दक्षता घेण्यात आली आहे.

      टोकन दर्शनासाठी सध्या ऑनलाइन पद्धतीने बुकिंग उपलब्ध आहे. परंतु, कालांतराने ऑफलाइन पद्धतीने देखील बुकिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. तथापि, टोकन दर्शन प्रणालीसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच दर्शनहॉल व स्कायवॉक लवकरच शासनाच्या माध्यमांतून निर्माण होणार आहे. त्याबाबत मंदिर समितीचा पाठपुरावा सुरू आहे.

     यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले, टोकन दर्शन प्रणालीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी मोफत संगणक प्रणाली विकसित करून दिली आहे. दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता, भविष्यात दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयींसाठी योग्य व्यवस्थापनावर काम करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

       दररोज १२०० भाविकांना लाभ टोकन दर्शन प्रणालीची बुकिंगची सुविधा मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. त्यासाठी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० च्या दरम्यान सहा स्लॉट निश्चित करून प्रती स्लॉटमध्ये २०० प्रमाणे दररोज १२०० भाविकांना याचा लाभ मिळणार आहे.

      याबाबत पुरेसा प्रमाणात तज्ज्ञ कर्मचारी नियुक्त केले आहे. टोकन दर्शन प्रणालीच्या शुभारंभादरम्यान टोकन घेऊन आलेल्या वारकरी भाविकांचे मंदिर समितीच्या वतीने स्वागत व सन्मान करण्यात आला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, या जयघोषात भाविकांनी दर्शनरांगेत प्रवेश केला.