Home देशविदेश विचार आणि विकास….

विचार आणि विकास….

          भौतिक विकास हा माणसाच्या वैचारिक विकासाशी संबंधित असतो.भौतिक विकास हा जर विनाश कार्य असेल तर माणसाचे विचार पण विनाशकारी आहे असे समजावे.

        माणसाचे विकासकारी विचार हे भौतिक विकास असाच करतात की ज्यामुळे आम जनतेचे नुकसान होणार नाही,मुठभर लोकांच्या फायद्यासाठी आम जनतेचा विनाश करणे म्हणजे विकास नव्हे,षडयंत्र करून शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करणे,त्याचा मालकी हक्क संपुष्टात आणणे,त्याच्या उत्पन्नाचे साधन काढून घेणे,त्यास देशोधडीला लावणे,त्यास मजूर बनविणे,मालकाचा मजूर बनवणे म्हणजे विकास करणे नव्हे.

       मोठमोठे समृद्धी मार्ग करणे मोठ-मोठे धरणे बांधणे,यासाठी मालक असलेल्या शेतकऱ्याला विस्थापित करणे,मालकाला गुलाम बनविणे म्हणजे विकास नव्हे…

      आधीच सरकारी तिजोरीवर कर्ज असताना शेकडो कोटी खर्च केवळ कुंभमेळाव्यासाठी करणे,त्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी सर्व झाडे कापून टाकणं,पर्यावरण नष्ट करणे म्हणजे विकास नव्हे तर विनाश होय. 

      लोखंड,सोने,कोळसा, अभ्रक इत्यादी खनिजे मिळवण्यासाठी डोंगरच्या डोंगर पोखरणे,जमिनीत खानी खदान करून जमीन पोखरले,जंगलाची तोड करणे,म्हणजे विकास नव्हे,तर हा विनाश आहे.

       पाण्याचे केंद्रीकरण करून मोठमोठे धरणे बांधणे,मोठमोठे कारखाने काढून,कामगारांचे शोषण करणे,भ्रष्टाचाराला वाव देऊन संपत्तीचे केंद्रीकरण करणे म्हणजे विकास नव्हे तर विनाश होय.”विनाशकारी विकास होय…

       अशा विकासास मनुष्य केंद्रित विकास न म्हणता,भांडवली विकास असे म्हणतात,म्हणजे केवळ भांडवलदारांचा विकास करण्यासाठीच केलेला हा खटाटोप किंवा षडयंत्र म्हणजेच विनाशकारी विकास होय.

       अत्याधुनिक शाळा बनविणे ऐवजी जीर्ण देवळे पाडून तिथे अत्याधुनिक देवळे बांधणे म्हणजे विकास नव्हे,सरकारी शाळांची खाजगीकरण करणे म्हणजे विकास नव्हे,तर शिक्षण सेवा हीच खरी सेवा आणि जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा,असा विचार करणे म्हणजे त्यास विकसित विचार असे म्हणतात.असेल न करणे म्हणजे विनाशकारी विचार असेच म्हणावे लागते. 

       रोग्यांची सेवा हीच जनसेवा,हीच ईश्वर सेवा समजून सार्वजनिक आरोग्य हे सरकारचे कर्तव्य आहे,एखाद्या उद्योगपतीकडे सुपूर्द करणे म्हणजेच सार्वजनिक आरोग्याचे खाजगीकरण करणे म्हणजे विनाशकारी विचार होत,असे समजावे लागेल. 

       विकसित विचार आणि विनाशकारी विचार,असे विचाराचे दोन प्रकार आहेत,विनाशकाले विपरीत बुद्धी,अशी एक म्हण आहे.

        विनाशकारी बुद्धीचे सरकार जर सत्तेत आले,आणि विनाशकारी बुद्धीचे मतदार अशी सरकार निवडून देत असेल तर देशाचे आणि जनतेची दुर्भाग्यच म्हटले पाहिजे,लहान मुलांचे भवितव्य अंधारात आहे अशीच समजावे लागेल. 

        अन्याय,अत्याचारी, भ्रष्टाचारी विचार हे कधीही देशाला आणि देशातील जनतेला घातकच असणार हे निर्विवाद सत्य आहे. 

       नागरी सुविधा,देशातील वाहतूक रस्ते,उद्योग,कारखाने,व्यापार,जल जंगल जमीन यांचा आपण विकास करीत आहोत की विनाश करीत आहोत? आज तर खरा प्रश्न आहे.

      विकास आणि विनाशकारी विकास यात फरक केलाच पाहिजे.ज्या विकासातून माणसाचे अस्तित्वच नष्ट होत असते,त्याचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान नष्ट होत असतो,असा विकास म्हणजे तो विकास नसून विनाश समजावा. असा विनाशकारी भौतिक विकास काय कामाचा ? असा विकास करण्यापेक्षा न केलेलाच बरा.असा विकास हा विकसित बुद्धीतून निर्माण होत नसून विपरीत बुद्धीतूनच निर्माण होत असतो.

        कमकुवत बुद्धीमुळेच असावी विनाशकारी विकास घडविला जातो,पाताळ यंत्र राजकर्ते जर सत्तेत असले तर अशा प्रकारचा हा विनाशकारी विकास घडत असतो. 

       म्हणून बुद्धीहीन आणि षडयंत्रकारी आणि मूठभर लोकांचा फायदा आणि बहुसंख्यांकांचे नुकसान करणारे सरकार सत्तेत निवडून आणता कामा नये,एवढी समज जरी बहुसंख्यांक लोकांमध्ये आली,तरी देशाचा विकास झाला असे समजावे. 

        मतदारांचा सुज्ञपणा हाच खरा विकास होय.आणि अज्ञानपणा हाच खरा विनाश होय.मतदाराला शहाणे करण्याची जबाबदारी ही शिक्षक,साहित्यिक,विचारवंत, मीडियावाले,समाजसुधारक, क्रांतिकारी यांची आहे. 

        पण यासाठी,या लोकांनी पण आधी आपण आपली बुद्धी तपासून घेणे जरुरीचे आहे.कारण माझी स्वतःची बुद्धी ही विकास कार्य आहे की विनाशकारी आहे,त्याचा शोध घेणे जरुरीचे आहे. 

       सरकारला भौतिक विकास करण्याची घाई का असते ? त्याचे कारण सत्तेत असणारे लोक हे बहुसंख्यांक यांच्या विकासापेक्षा मुठभर जमीनदार आणि भांडवलदारांचा विकास करण्यातच मग्न असतात.या त्यांच्या संकुचित विचारामुळे विनाशकारी विकास घडताना दिसतो आहे.

       ज्यामुळे जल जंगल जमीन ही नैसर्गिक साधने विस्थापित होत आहेत,यांची नासधूस होत आहे.निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.जंगले तोडल्या जात आहेत,डोंगरे पोखरून काढल्या जात आहेत,बोरवेल च्या नावाने जमिनींना छिद्रे पाडल्या जात आहेत,जमीन तोडून मोठमोठी खदाणे निर्माण केल्या जात आहे ते,वाळू उपसा करून नद्यांचे नुकसान केल्या जात आहे,मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून तेथे कारखाने उभे केल्या जात आहेत,या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून जागतिक तापमान वाढले आहे,यामुळे सारे जग परेशान आहे,याचा अर्थ आपणच आपल्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी भस्मासुर राक्षस निर्माण केले आहे. 

       आता यास कसे मारायचे?हे सुचणार नसेल तर,मग या बुद्धीचा उपयोग काय ? मानव जातीला जन्मास येऊन उपयोग काय?असा प्रश्न चिंतकांसमोर उभा राहतो.

     विपरीत बुद्धी,अविचारी बुद्धी,सोशक बुद्धी,एवढी पुढे जाते,एवढी पुढे जाते की,ती जागतिक महायुद्ध घडवून आणते,आणि अखिल मानव जात नष्ट झाली तरी अशावेळी बुद्धीला त्याचे काहीच वाटत नाही,केवढे हे मानवी बुद्धीचे अवमूल्यन म्हणायचे? हे कशासाठी? तर केव्हा स्वार्थासाठी,लोभापायी बहुसंख्यांक यांचा विचार न करणे,त्यांना गुलाम करण्यासाठी स्वतः शोषित बनणे,माणसाचे अवमूल्यन होय. 

       आता अशी वेळ आली आहे की,विकास कशास म्हणावे ? विकसित विकास आणि अविकसित विकास म्हणजे विनाशकारी विकास म्हणजे काय? यावर विचार करण्याची वेळ आली आहे.

     तसेच अविकसित बुद्धी आणि विकसित बुद्धी म्हणजे काय? यावर पण विचार करण्याची वेळ आली आहे.विनाशकारी बुद्धी म्हणजे विकसित बुद्धी नव्हे,हे आता आपणास मान्यच करावे लागेल,हे एकदा मान्य झाले की मग शोषित आणि शोषक यातील फरक लक्षात घेऊन,शोषितांची बाजू घेणे आणि शोषितांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध होणे जरुरीचे होते. 

            लेखक…

             दत्ता तुमवाड…

        सत्यशोधक समाज नांदेड…

दिनांक : 17 मे 202 6, फोन : 9420912209.