राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील, पवारांना धक्का!.. — 50 वर्षानंतर भाजपचे वर्चस्व!..

 बाळासाहेब सुतार

निर नरसिंहपुर प्रतिनिधी

                  नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची शुक्रवारी (दि.16) बिनविरोध निवड करण्यात आली. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांचीही बिनविरोध निवड झाली.

                राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची सन 2024 ते 29 ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर नवी दिल्ली येथे महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाच्या आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हा पवारांना धक्का मानला जात आहे.

         हर्षवर्धन पाटील हे देशातील व राज्यातील सहकारी साखर कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक दशके सक्रियपणे कार्यरत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे महत्वाचे समजले जाणारे सहकार मंत्रीपद सुमारे 9 वर्षे सांभाळले आहे.

             तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना या दोन्ही महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून अनेक वर्षे काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले आहे.

           शेतकरी व देशातील साखर उद्योगांच्या अडचणी व समस्या ह्या केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे मांडून त्या सोडविण्यावर लावल्यावर आपला भर राहील तसेच देशातील व राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या गुणवत्ता वाढी बरोबरच त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही निवडीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी दिली. दरम्यान, देशपातळीवरील साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.