दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन नगरीत आळंदी देवस्थानच्या वतीने इंद्रायणी मातेची महाआरती भक्तिभावात संपन्न झाली. इंद्रायणी नदी घाटावर सायंकाळी झालेल्या या महाआरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
वैदिक मंत्रोच्चार, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि दीपांच्या उजेडात इंद्रायणी मातेची महाआरती करण्यात आली. यावेळी सुधाताई महाजन यांच्या हस्ते इंद्रायणी मातेचे जल पूजन व ओटी भरण करण्यात आले. यावेळी इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपणे, स्वच्छता राखणे व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देवस्थानकडून देण्यात आला.
यावेळी विश्वास्त चैतन्य महाराज कबीर, विधितज्ञ रोहीणी पवार, विधितज्ञ राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, देहू संस्थानचे अध्यक्ष बापुसाहेब मोरे, विश्वस मानिक महाराज मोरे, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त माधवी निगडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी सभापती डि.डि.भोसले पाटील, सचिव अजित वडगांवकर तसेच आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी भाविक, महीलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथजी यांनी विशेष परीश्रम घेतले.
याप्रसंगी देवस्थानच्या विश्वस्त विधीतज्ञ रोहिणी पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “इंद्रायणी माता ही केवळ नदी नसून आळंदीची जीवनवाहिनी आहे. तिचे पावित्र्य, स्वच्छता आणि संवर्धन राखणे ही प्रत्येक भाविकाची सामूहिक जबाबदारी आहे. महाआरतीसारख्या उपक्रमांतून समाजात धार्मिकतेसोबत पर्यावरणीय जाणीव निर्माण व्हावी, हा देवस्थानचा उद्देश आहे.”
तसेच चैतन्य महाराज कबीर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “वारकरी संप्रदायात नद्यांना मातेसमान मानले जाते. इंद्रायणी मातेचे स्वच्छ व निर्मळ रूप टिकवणे ही खरी भक्ती आहे. नामस्मरणासोबतच पर्यावरण संवर्धनाची जोड दिली तरच आपली परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचेल.”
आळंदी देवस्थानकडून पुढील काळात महिन्याच्या शुद्ध व वद्य एकादशीच्या दिवशी ही महाआरती नियमितपणे करण्यात येणार असून, भाविकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता भविष्यात ही आरती नित्य करण्याचा संकल्प देवस्थानने व्यक्त केला आहे.
दरम्यान, या आरती सोहळ्यासाठी ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के यांनी एक लक्ष रुपयांची देणगी आळंदी देवस्थानकडे सुपूर्त केली. या सहकार्याबद्दल देवस्थानच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.महाआरतीनंतर भाविकांनी इंद्रायणी मातेचे दर्शन घेतले. देवस्थानच्या या उपक्रमामुळे धार्मिकतेसोबत सामाजिक व पर्यावरणीय भान अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.



