वाहतूक नियमाचे पालन करणे काळाची गरज :- परिवहन अधिकारी अतुल आदे… — साईनाथ ड्रायव्हिंग स्कूल तर्फे वाहनचालकांना हेल्मेट वाटप…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने चालकांनी वाहतूकीच्या नियमांचे तंतोतंत पालन केल्यास अपघात टाळता येतात. रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी.प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शहरात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरात केलेल्या अंमलबजावणीने काही प्रमाणात अपघातांचे प्रमाण कमी झाले झाल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले.

            चऱ्होली बुद्रुक येथे श्री साईनाथ ड्रायव्हिंग स्कूल यांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त हेल्मेट वाटप तसेच वाहन चालकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांचे उद्घाटन पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भीमराज काकडे, सुबोध मेडसीकर, पवन नेवाडे, माजी महापौर नितीन काळजे, भाजप नेते डॉ.राम गावडे, माजी नगरसेविका विनया तापकीर, सचिन गिलबिले, भाजप व्यापारी आघाडी अध्यक्ष आनंद वडगावकर, मयूर भोसेकर, सुप्रिया जगताप, विश्वास टोंगळे, विनोद वरखडे, पांडुरंग इंगवले, मसुनाथ तुपे तसेच साईनाथ ड्रायव्हिंग स्कूलचे पदाधिकारी, सर्व वाहन चालक व नागरिक उपस्थित होते.

            परिवहन अधिकारी आदे म्हणाले, ”सीट बेल्ट, हेल्मेट ही पोलिसांच्या भीतीने न वापरता आपल्या सुरक्षिततेच्या हेतूने त्यांचा वापर करा. ओव्हर टेक व ओव्हर स्पिडिंग हे माणसाला अपघातग्रस्त करतात. यासाठी लवकर निघा, सावकाश जा आणि वेळेत पोहोचा, या सूत्राचे भान ठेवा. अठरा वर्षांखालील मुलांच्या ताब्यात पालकांनी वाहने देऊ नये. मुलांच्या अतिउत्साहामुळे अपघात होऊ शकतात. याचे योग्य भान पालकांनी ठेवणे आवश्यक आहे.” 

           सुबोध मेडसीकर यांनी रस्ते सुरक्षेचे काही प्रकार सांगितले. अपघात होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, रस्ता कसा वापरावा, पादचाऱ्यांनी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने का चालावे, अपघाताची वेळ येऊ नये, यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, वाहतुकीच्या चिन्हांचे ज्ञान किती अत्यावश्यक आहे, याबद्दल मार्गदर्शन केले.