दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर शिखरावर २२ किलो सुवर्ण कलशारोहनाचा ऐतिहासिक संकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह.भ.प.चैतन्य महाराज कबीरबुवा यांना “वैष्णव सेवा पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा गौरव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात ह.भ.प.डॉ.नारायण महाराज जाधव यांनी आपल्या ओजस्वी कीर्तनसेवेच्या माध्यमातून संत परंपरा, भक्तीमार्ग व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या प्रसंगी दत्ताभाऊ चिंचवडे, जयंत उर्फ आप्पा बागल, आळंदी संस्थानचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर, संजय घुंडरे पाटील उपस्थित होते.
“वैष्णव सेवा पुरस्कार” मिळाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ह.भ.प. श्री चैतन्य महाराज कबीरबुवा म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ व्यक्तिगत सन्मान नसून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आणि भाविकांच्या प्रेमाने झालेला गौरव आहे. समाजहित, भक्तिसेवा आणि देवस्थान उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करण्याचा संकल्प यामुळे अधिक दृढ झाला आहे.”



