दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे – पुण्यातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
बाजीराव रस्त्यावरील नुमवी प्रशालेत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना १२५ दप्तरे, १२५ वह्या, १२५ कंपास बॉक्स आणि १२५ पाण्याच्या बाटल्या यांचे किट वितरित करण्यात आले. या उपक्रमात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
यावेळी पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाजाचे ऋण फेडणाऱ्या गणेश मंडळांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा.” त्यांनी तुळशीबाग मंडळाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, डॉ.शैलेश गुजर, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उदय जगताप म्हणाले, “शालेय जीवनातच ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चकोर सुबंध, साई डोंगरे, मयूर दिवेकर, प्रतीक इप्ते, तुषार पवार, सागर पेद्दी, अक्षय पुजारे, अनिरुद्ध बारणे यांचे विशेष योगदान राहिले. कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, “अपुऱ्या साधनांमुळे शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे ही काळाची गरज आहे, आणि मंडळ हे सामाजिक भान ठेवून पुढे सरसावले आहे.” गणेशोत्सव मंडळांचे धार्मिकतेबरोबर सामाजिक कार्यातले योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.



