साहेब!,आम्ही भटके विमुक्त प्रवर्गात जन्म घेऊन पाप केले का?

        रोहन आदेवार

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ/वर्धा..

       आम्ही गोसवी आहो साहेब!, या मासाळा गावाला येऊन ३०-३५ वर्ष झाले. ना जमीन आहे,ना जन्म,मृत्यू ची नोंद,ना कोतवाली पुरावा,फक्त राशन कार्ड,मतदान कार्ड,आधार कार्ड आहे.

       बाप शिकला नाही,आजा शिकला नाही,पनजा शिकला नाही,मग शिक्षणाचे पुरावे कोठून आणणार?आम्ही शाळेत शिकतो, आमच्या टी.सी.वर गोसावी लिहले आहे,आमच्या गावात ७०० च्या वरती घर आमच्या गोसावी समाजाचे आहे. 

       मात्र,कोणाचकडे कागदचं नाही साहेब.पोरं कसे शिकवावे समजून नाही राहिले.”साहेब, कोणत्याही शासकीय योजनेचा आजतागत लाभचं मिळाला नाही.

       माझ्या दोन मुली आहे. कु.मुस्कान चैनगिर राठोड वय १८ वर्ष १२ वी सायन्स मध्ये आहे.कु.खुशबू चैनगिरी राठोड वय १६ वर्ष ११ वी सायन्स,माझे वडील श्री.चैनगिरी राठोड ४२.वर्ष शिक्षण नाही.माझे आजोबा श्री.देवगिर राठोड ६० वर्ष शिक्षण नाही.माझे पणजोबा मृत श्री.तोतराम राठोड ७८ वर्ष शिक्षण नाही.

      आमच्या घरी राशन कार्ड आहे,आधार कार्ड आहे,पेन कार्ड आहे,घर टॅक्स पावती आहे,कोतवाल नकल नाही,महसूल पुरावा जुना नाही, कोणाचा जन्म दाखला नाही, बाप, आजा, पनजा जन्म कोठे झाला माहिती नाही.

      ३५ वर्षा पासून मसाळा गावात राहतो.गोसावी म्हणून आमची ओळख आहे.समाज संघटन गोसावीच आहे.लग्न ही लोकांचे गोसावी समाजातच होतात.लग्न विधी समाजा मध्ये सारखीचं होते.पूजन ही समाजात जे होते ते आमच्या गावात प्रत्येक गोसाव्यात होत असते.

       तरी तो जातीचे प्रमाणपत्र देणारा म्हणतो तू गोसावी आहे याचा १९६१ चा पुरावा घेऊन ये म्हणून मला जातीचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला साहेब.

        जात वैधता तर अवघड आहे जी.मग आम्ही हिंदू गोसावी समाजात जन्म घेऊन पाप केले का? आम्ही या देशाचे आहो का नाही हे तरी सांगा? आम्ही कोणत्या ग्रहातून आलो ते सांगा? नाही तर तुम्हीच सांगा आम्ही कोणत्या जातीचे आहो.DNA वरून जर समजत असेल तर करून घ्या साहेब!

       मात्र शिक्षणासाठी आणि योजनांसाठी आम्हाले जातीचे प्रमाणपत्र द्या.नाही तर या समाजात जन्म घेतला म्हणून सजा काय आहे ते तरी सांगा?

     अश्या कठोर भाषेत हा सर्व गोसावी समाज बोलत होता.

         आम्ही भटके आहो हे स्पष्ट असतानाही कागद मागणे म्हणजे आमच्यावर अत्याचार नाही का साहेब…..

       वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मसाळा गावातील हे दृश्य पाहून आणि भाष्य एकूण मन कसे हेलावून गेले. हा प्रश्न कसा सुटेल, मोका चौकशी अहवाल मान्य करीत नाही, कागद नसल्याने ऑनलाइन अर्ज सादर होत नाही, असे एकंदरीत चित्र भटक्या विमुक्त जमातीच्या जातप्रमानपत्र मिळविणे म्हणजे मोठी सर्कस झाली आहे.