प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
निवडणूकांमध्ये मताचा बाजार होवू शकते व जनता विरोधी,भांडवलदार तथा मनुवादी विचारसरणीचे राजकारणी प्रलोभने दाखवून रुपयांच्या बलावर मतदारांचे मत विकत घेवु शकतात आणि मतदार प्रलोभनाला बळी पडून मत विकु शकतात याची जाणीव,भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना होती.
म्हणूनच त्यांनी भारतीय मतदारांना,”लोकशाहीतील संभाव्य धोके लक्षात घेऊन,गंभीर इशारा देत म्हटले होते की,”मताचा अधिकार हा तुमचे स्वतःचे,वर्तमानातील आणि भविष्यातील भवितव्य निर्माण करण्यासाठी दिला आहे…
यामुळे,”स्वतःच्या मताला पत्नी व मुलांप्रमाणे जपा,”स्वतः प्रमाणे जपा,”पत्नी व मुलांवर कुणी आघात केला व त्यांच्या चारित्र्यांचे धिंडवडे कुणी काढले तर तुम्ही स्वतः त्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढे येता,संघर्ष करता आणि स्वतःच्या पत्नीचे व मुलांचे संरक्षण करताय,कारण पत्नीच्या व मुलांच्या चारित्र्यात तुमचे चारित्र्य व पुढील भविष्य दडलेले असते.
याचबरोबर पती व बापाला काही झाले,आरोग्य बिघडले तर पत्नी आणि मुले काळजी घेतात,पती व बापाच्या निट आरोग्यासाठी तळमळतात.
त्याचप्रमाणे भारत देशातील,”नागरिकांच्या मतांमध्ये,(पुरुष/महिला) वर्तमानातील आणि भविष्य काळातील भवितव्य अवलंबून आहे.महाराष्ट राज्यासह भारतीय नागरिकांचे वर्तमान व भविष्य त्यांच्या मतांमध्ये असेल तर भारतातील मतदारांनी स्वतःची मत विकून स्वतःचे भविष्यातील व वर्तमानातील भवितव्य व त्यांचे लोकशाही अंतर्गत अधिकार धोक्यात आणले पाहिजेत काय? याचा सारासार विचार मतदारांनी गांभीर्याने केला पाहिजे.
म्हणूनच युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील नागरिकांना अविरत संघर्ष करुन,”जो मताचा अधिकार मिळवून दिला,तो किती महत्वपूर्ण व शक्तीशाली आहे हे दिसून येते.
“मत विकू नका”म्हणजे “तुमचं मत विकू नका” असे म्हणायचे आहे,पैशांसाठी किंवा इतर प्रलोभनांसाठी मतदान विकण्याऐवजी आपल्या मताचा योग्य वापर करून लोकशाहीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन,”भारतीय संविधान,”भारतीय मतदारांना, करते आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणात,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,वंचितचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर,मनसे प्रमुख राज ठाकरे,तथा बसपाचे पदाधिकारी हे लोकांना ‘पाकिटं घेऊन आयुष्य विकू नका,कर्तव्याला चुकू नका’ असे आवाहन करत आहेत.
यामुळे सर्व भारतीयांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी,”लोकशाहीचे व मतदारांच्या मताचे महत्व किती महत्वपूर्ण आहे हे आता हळूहळू काही राजकीय व सामाजिक संघटनांच्या प्रमुखांना आणि बऱ्याच मतदारांना कळून चुकले आहे.
मत देणे हा मतदारांचा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे आणि तो विकणे म्हणजे हा अधिकार गमावणे आहे.
तद्वतच मत विकणे म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे होय,ज्यामुळे चुकीचे लोक सत्तेत येऊ शकतात,चुकीचे सत्ताधारी चुकीचे निर्णय घेवू शकतात,भ्रष्ट यंत्रणेला सहकार्य करु शकतात,उघडपणे भ्रष्टाचार करु शकता.मत विकू नका’ असे सांगणे म्हणजे मतदारांना त्यांच्या कर्तव्याची आणि जबाबदारीची आठवण करून देणे होय,जेणेकरून ते विचारपूर्वक मतदान करू शकतील.
सध्याच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये (उदा. मुंबई) ‘कर मतदान,सांगतंय संविधान!’,यांसारख्या घोषणांद्वारे मतदारांना मतदानासाठी प्रेरित केले जात आहे,”जे ‘मत विकू नका’ या विचाराला बळ देते.
‘मत विकू नका’ हे मतदारांना त्यांच्या मताचे पावित्र्य जतन करण्यासाठी आणि निवडणुकीत सक्रिय व प्रामाणिकपणे सहभागी होण्यासाठी,महत्वाचा संदेश आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते,लोकशाहीत बहुमताने अल्पमतावर जुलूम होऊ नये आणि मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे,तसेच मतदारांनी व्यक्तिपूजा टाळावी यासाठी निवडणूक प्रक्रिया आहे..
युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वातंत्र्य, समता,बंधुता,न्याय यावर आधारित असून,त्यांनी शिक्षण,शेती,अर्थशास्त्र,स्त्रियांचे हक्क यावरही महत्त्वपूर्ण मते मांडली,ज्यात ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध’ आणि ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ यांसारख्या संकल्पनांचा समावेश आहे.
मतदान आणि लोकशाहीबद्दलचे विचार मांडताना त्यांनी सांगितले होते की,अल्पमताचे संरक्षण व्हावे,लोकशाहीत बहुमताने अल्पमतावर अन्याय करू नये.
मतदारांनी निपक्षपातीपणे,भीतीमुक्त वातावरणात मतदान करावे यासाठी त्यांनी गुप्त मतदानाची पद्धत आणली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मतदारांना आणि या देशातील नागरिकांना सांगितले आहे की व्यक्तिपूजा टाळा,व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठे असून,लोकशाहीत व्यक्तिपूजा नसावी,असा सल्ला त्यांनी मतदारांना दिला आहे.
याचबरोबर शिक्षण आणि समाज यावर भाष्य करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आवर्जून सांगितले आहे की,शिक्षण हेच सामर्थ्य आहे.यामुळे शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असून,ते वाघिणीचे दूध आहे,यामुळे देशातील बहुसंख्य बहुजन समाजातील महिला,पुरुषांनी भविष्यात शिक्षणाची दारे कोणत्याही स्थितीत बंद होऊ देऊ नये.
तद्वतच इतिहास विसरू नका हे सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील नागरिकांना सांगितले आहे.याचबरोबर भूतकाळातील चुकांमधून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे,असेही ठामपणे ते म्हणाले होते.
अर्थव्यवस्था आणि शेती…
त्यांनी शेतीचे राष्ट्रीयीकरण करण्याची संकल्पना मांडली,ज्यात पीक पद्धती,पाणी व्यवस्थापन,उत्पादन वाढ यावर भर होता.
शेतकऱ्यांना मदत करताना शेतीसाठी लागणारा खर्च सरकारने उचलावा,अशी सूचना त्यांनी केली होती.
स्त्रियांचे हक्क…
जाचक रूढी-परंपरांपासून स्त्रियांना मुक्तता मिळावी यासाठी त्यांनी मोठे कार्य केले.
स्वतःवर विश्वास ठेवून आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.आपल्या हक्कांसाठी नेहमी संघर्ष करत राहा असेही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकांना सांगितले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ मतदानापुरते मर्यादित नसून,ते एक न्यायपूर्ण,समताधिष्ठित आणि लोकशाही मूल्यांवर आधारित समाज घडवण्याबद्दल होते,असे स्पष्ट दिसते आहे.
सध्याच्या स्थितीत भांडवलदार विचारसरणीचे राजकीय पक्ष प्रमुख हे सार्वत्रिक निवडणूकीत भांडवलदारांकडून अमाफ रुपये घेतात,मतदारांना वाटतात,निवडून येतात व भांडवलदारांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतात.
मात्र निवडून दिलेले तेच लोकप्रतिनिधी मतदारांच्या/महिला-पुरुषांच्या अधिकारांना पायदळी तुडवून असुरक्षित करतात,त्यांच्या हिताकडे,उन्नतीकडे,संरक्षणाकडे,मुलभूत गरजांकडे व हक्कांकडे पुर्णतः दुर्लक्ष करतात.त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे व रोजगाराकडे पाठ फिरवून धमक्या देतात,याची जाणीव मतदारांना वेळीच झालेली बरी!


