मत्सर म्हणजे द्वेष कपट सूड बदला ची भावना.माणूस जन्मतः शुद्ध पवित्र निष्पक्ष निर्लेप निस्वार्थी नसतो.स्वार्थ हा स्थाई भाव आहे.स्वतःचे हित जपण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा मोह झाला तर ती गोष्ट मिळण्यासाठी माणूस आधी विधायक प्रयत्न करतो,त्याने नाही जमले तर हिंसक बनतो,यामुळे त्याच्यात द्वेष मत्सर निर्माण होऊन तो विध्वंसक मार्गाचा अवलंब करतो.
आपणास कुणी त्रास देऊ नये,अशी अपेक्षा माणूस करतो,पण आपणही कुणाला त्रास देता कामा नये,असा मात्र विचार करत नाही.जेंव्हा स्वार्थाची गोष्ट येते,तेंव्हा तो लोभी बनतो ,त्यामुळे त्याच्यात विकृतीच्या भावना जागृत होतात.विकृती म्हणजे अहंकार क्रोध द्वेष ,निचभवना,यामुळे तो अन्याय अत्याचार करण्यापर्यंत त्याची मजल जाते.मग तो एक चूक निस्तारण्यासाठी अनेक चुका करतो,जसे की,एक खोटी गोष्ट लपवण्यासाठी त्यास अजून दहा खोट्या गोष्टी बोलाव्या लागतात,मग त्यास खोटे बोलण्याची सवयच होते.एक छोटी चोरी लपली गेली की,त्यास चोरीची सवय लागते,मग तो मोठ्या चोऱ्या करायला लागतो.अशा प्रकारे एकदा का विकृतीचा सहारा घेतला की माणूस विकृत बनतो,म्हणून तो अनेक अवैध धंदे करायला लागतो.गुन्हेगार बनतो.या सर्वांचे मूळ वाईट चिंतन,हे आहे.यासाठी कुणाही बद्दल वाईट चिंतन बंद करावे,तसा दृढ निश्चय करून त्याची अंमलबजावणी करावी.असे केल्याने आपल्यातील द्वेष मत्सर हेवा लोभ सूड भावना नाहीशी होते,असे होणे म्हणजेच आपल्या मनाची विचाराची शुद्धता होय.समतभाव,सम्यकदृष्टी निर्माण झाली की,विषमतेचे विचार मनात येणार नाही.संतानी समता,बंधुभाव निर्माण व्हावा आणि माणसातील विकृती नष्ट होऊन तो निष्पाप निस्पृह सात्विक बनावा म्हणून सारे आयुष्य झिजविले.
माणूस मुळात स्वार्थी आहे,कारण त्यास शारीरिक मानसिक लैंगिक भूक आहे,त्यासाठी तो अन्न मिळवण्यासाठी आणि शरीराला ऊन वारा पाऊस चोर यापासून त्रास होऊ नये,आणि विश्रांतीसाठी जागा असावी म्हणून त्याला घर हवे,वस्त्र हवे,संसार चालवण्यासाठी हाती उत्पन्नाचे साधन ( शेती व्यापार नोकरी ) असावी ,यासाठीचा स्वार्थ तर करावाच लागतो,शिवाय आरोग्य शिक्षणासाठी पैसा हवा.या सर्व गरजासाठी माणूस स्वार्थ या आपल्यातील गुणाचा कौशल्याचा वापर करीत असतो.हे ठीकच आहे,पण स्वार्थ साधण्याची पद्धत मात्र विकृत असणे चुकीचे आहे,कष्ट मेहनत अभ्यास करून वेळेचा शरीराचा सदुपयोग करून पण आपला स्वार्थ साधता येतो,परंतु वाम मार्गाचा,वाईट मार्गाचा आणि वाईट गुणांचा म्हणजे दुर्गुणांचा वापर करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला की,मग इतरांचा मत्सर द्वेष करण्याची सवय लागते.सत्य मार्गाने म्हणजे इतरांना त्रास होणार नाही,याची काळजी घेत जर आपला संसार केला तर तो सज्जनांचा स्वार्थ होईल.जो शुद्धच निर्मळ असेल.ज्यात विकृत भावना नसणार
समजा आपण सज्जन आहोत,आपला कुणासही त्रास होत नाही,तरी पण आपल्यास एखादा त्रास देत असेल,तो दुष्ट दुर्जन गुंड असेल तर त्याच्याशी कसा व्यवहार करावा ? त्याचा प्रतिकार नाही केले तर आपले अपरिमित असे नुकसान होणार आहे,तेंव्हा काय करावे ? हा एक गंभीर प्रश्न कधी कधी आपल्यापुढे आ वासून उभे असतात,त्यावेळी असे प्रश्न कसे सोडवावे ? याचे उत्तर मिळत नाही,अशावेळी समोरचा माणूस दुर्जन असला तरी आपण सज्जन आहोत,याचा विसर पडता कामा नये.काही झाले तर दुष्मानाचा सुद्धा मत्सर करता कामा नये.त्यास कधीही वाईट वागणूक देऊ नये. तो जसा वागतो तसे सज्जनाने न वागता,आपण आपला सज्जनाची प्रतिष्ठा जाईल असे वर्तन करू नये.सज्जनाने सज्जनाला शोभेल असेच वर्तन करावे,दुर्जनाचे वर्तन करू नये.दुर्जनाबरोबर दुर्जनच होऊन भांडता काम नये.कारण दुष्ट दुर्जन गुंड प्रवृत्तीच्या लोकांची बुद्धी त्याच्या गुडघ्यात असते,आणि सज्जनांची बुद्धी त्याच्या डोक्यात असते असे म्हणतात,ते खुज्या संकुचित विचाराचे असतात,ओढ्याच्या पाण्याला जसा खळखळाट असतो,तसे त्यांची बुद्धी आणि वर्तन असते, तापट बुद्धीचे तामसी प्रवृत्तीचे असतात.म्हणून त्याचे वर्तन खळखळाट पाण्यासारखे असते,म्हणून त्यावर बुडबुडे येतात आणि क्षणार्धात फुटतात.परंतु सज्जन माणूस दमदार असतो,त्याच्या विचाराची उंची हिमालय पर्वतासारखी उंच आणि मन समुद्राचे असते.सज्जन कोणत्याही अवघड परिस्थितीत भावनेचा वापर न करता बुद्धीचा वापर करतात.आणि आलेल्या प्रसंगावर मार्ग काढतात. साम दांड दंड भेद या मार्गाचा वापर करतात.म्हणून म्हणतात की,” जिसका दिमाख चलता नहीं ,उसका हात चलता है “.
मुळात प्रत्येक माणूस हा निष्पापच असतो,चांगलाच असतो,निर्लेप असतो.निर्विकारी असतो,पण जेव्हा तो जन्मतो आणि मग त्याच्यावर आईचे वडिलांचे कुटुंबातील माणसांचे विचार जे कानावर पडतात,नंतर गल्लीतील नंतर गावातील लोकांचे विचार आणि कर्म याचा परिणाम त्यावर होतो,याचा अर्थ त्याचे भोवती असलेला माहोल चांगला किंवा वाईट त्यानुसार तो सज्जन किंवा दुर्जन बनत असतो.भौतिक परिस्थितीचा परिणाम त्याच्या वर्तनावर होतो,म्हणजे त्यानुसार त्याचे बोलणे वागणे व्यवहार होत असतो.संस्काराने ,अभ्यासाने, प्रॅक्टिस ने प्रयत्नाने पण नरका नारायण होतो किंवा दानव पण होत असतो.म्हणून सात्विक सज्जनांचे संगतीत राहिले पाहिजे.कारण संगतीचा परिणाम असतो.म्हणून म्हण आहे ” सुसंगती सदा घडो , सुजन वाक्य कानी पडो “.
बरेच जण इतराशी वागताना बेदरकार वागतात आणि इतरांनी मात्र माझ्याशी चांगले वागावे ,अशी अपेक्षा करतात. हे चुकीचे आहे.कारण आपण कुणाचे वाईट चिंतीत असलो तर आपले पण कुणीतरी वाईटच चिंतनार हे लक्षात ठेवले पाहिजे.” चिंती परा तो येई घरा” .म्हणून कुणीही आपले वाईट चिंतात असेल तरी आपण त्याचे वाईट चिंटू नये.याचा अर्थ आपण आपला सज्जनांचा गुणधर्म त्यागता काम नये.या अर्थानच तुकाराम महाराज म्हणाले की,कुणाही जीवाचा न घडो मत्सर.शत्रूलाही मित्र बनविण्याची ताकद म्हणजे विशेष पराक्रम होय.पराभव नव्हे.



