रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
नागपूर :- “तहानल्यांना पाणी आणि भुकेल्यांना अन्न हीच खरी गरज मायबाप हो…” संत गाडगे महाराजांच्या या विचारांना कृतीत उतरवत, नागपूरमधील बेलदार समाजाच्या महिलांनी सामाजिक भान जपत एक अनोखी सामाजिक बांधिलकी जपली.
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार रोप्य महोत्सवी वर्ष आणि जागतिक महिला दिन या निमित्ताने, बेलदार सखी मंच बचतगट, बेलदार महिला आघाडी, मैत्रेय संघटना नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, जयताळा येथील मांग-गारुडी समाजाच्या वस्तीत राहणाऱ्या ६५ गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
या वस्तीत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले हे कुटुंब कचरा वेचण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अनेक जेष्ठ नागरिक, आजारी व अपंग व्यक्ती येथे राहतात, जे कामावर जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत, त्यांच्या गरजांचा विचार करून बेलदार समाजातील महिलांनी ही मदत पुढाकार घेऊन केली.
यावेळी नागपूर शहरातील विविध भागातून आलेल्या बेलदार समाजाच्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. “आपण यांची भूक पूर्णतः मिटवू शकत नाही, पण काही दिवसांची छोटीशी मदत त्यांचं आयुष्य थोडं सुखकर करेल,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सामाजिक एकोपा, मदतीचा हात आणि महिलांची सामूहिक जबाबदारी या घटकांचा सुंदर मिलाफ म्हणजेच हा उपक्रम ठरला.



