नववर्षानिमित्त राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी मी आपणाला वैचारिक शुभेच्छा देतो.मी देत असलेल्या या वैचारिक शुभेच्छा सर्व बांधवांनी काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यावर आपल्या रोखठोक प्रतिक्रिया नोंदवाव्यात, ही विनंती.
धर्म ही लोक मनावर खूप मोठा प्रभाव गाजवणारी सांस्कृतिक संस्था आहे. ही संस्था निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित आहे. त्यामुळेच या पृथ्वीवर जसा एकच एक सूर्य तळताना दिसतो त्याप्रमाणे जगात एकच एक धर्म अस्तित्वात असलेला दिसत नाही. धर्म जर निसर्गनिर्मित असता तर तो सर्व पृथ्वीवासीयांचा एकच धर्म राहिला असता. निसर्गाचा सार्वत्रिक नियम म्हणजे धर्म असा जर धर्म या शब्दाचा अर्थ लावला तर मात्र सर्व पृथ्वीवासीयांसाठी लागू असलेला एकच एक धर्म अस्तित्वात आहे. तो सर्व मानव आणि प्राणीमात्रांस सारख्याच प्रमाणात लागू आहे.
मानव निर्मित धर्माचे दोन पैलू असतात. एक नैतिक आचरणाची शिकवण देणारा पैलू आणि दुसरा कर्मकांडी, प्रतीकात्मक, प्रदर्शनी व बाजारू स्वरूपाचा पैलू. जगात अस्तित्वात असलेल्या ख्रिस्ती, इस्लाम, बौद्ध, जैन, वैदिक ब्राह्मणी उर्फ हिंदू (आता याला हे लोक सनातन धर्म म्हणू लागले आहेत.) अशा सर्वच धर्मांमध्ये माणसांना नैतिक आचरणाची म्हणजेच सदाचाराची शिकवण देणारा पैलू हा असतोच.
या सर्व धर्माचे नैतिक आचरण विषयक पैलू तपासले तर त्यामध्ये बहुतांशी समानता आढळून येईल. त्यात मतभेदाचे आणि वादग्रस्त मुद्दे फार कमी आढळून येतील. परंतु या सर्वच धर्मांचा कर्मकांडी, प्रतीकात्मक, प्रदर्शनी व बाजारू स्वरूपाचा पैलू लक्षात घेतला तर त्यामध्ये कुठलीही समानता आढळून येत नाही.
या अर्थाचा धर्म वादग्रस्त आहे म्हणून या अर्थाचा धर्म सार्वजनिक सत्यधर्म होऊ शकत नाही. असा धर्म म्हणजे मूलभूत सार्वत्रिक नैतिक धर्माचे टरफल असते. गाभा अथवा सत्त्व नसते. म्हणूनच असा कर्मकांडी धर्म कोणत्याही माणसांना मूलभूत वैश्विक सत्यापर्यंत पोचण्यास खऱ्या अर्थाने मदत करू शकत नाही.
उलट असा धर्म माणसांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित करतो. असा धर्म सर्वांमध्ये प्रेम मैत्री रुजवण्याऐवजी ते वेगळे आणि आम्ही वेगळे हा भाव रुजवतो.जेव्हा माणसांच्या मनामध्ये ते वेगळे आणि आम्ही वेगळे हा भाव निर्माण होतो तेव्हा परस्परांबद्दल प्रेम मैत्री राहत नाही. दुरावा, संशय आणि प्रसंगी द्वेषमत्सरही निर्माण होतो.
अशा कर्मकांडी, प्रदर्शनी धर्माने जगामध्ये माणसा माणसात खूप भांडणे लावलेली आहेत आणि भयंकर स्वरूपाची हिंसा देखील घडवून आणलेली आहे. या कारणामुळेच भारताच्या संविधान निर्मात्यांनी धर्म हा राजकारणापासून दूर ठेवला पाहिजे अशी भूमिका घेतली. भारताचे सेक्युलर राष्ट्र बनवण्याच्या दिशेने स्वातंत्र्योत्तर राज्यकर्त्यांनी वाटचाल केली पाहिजे असा धडा घालून दिला.
संविधान निर्मात्यांनी घालून दिलेला सेक्युलॅरिझमचा धडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे पिल्लू असलेला भारतीय जनता पक्ष यांनी पूर्णपणे बाजूला ठेवला आणि कर्मकांडी, प्रतिकात्मक, प्रदर्शनी व बाजारू धर्म राजकारणात घुसडला. हे लोक खऱ्या नैतिक धर्मापासून खूप दूर आहेत, हे आजवरच्या त्यांच्या सार्वत्रिक वर्तनावरून सिद्ध झालेले आहे. नैतिक धर्म सत्य, शांती, अहिंसा आणि प्रेम मैत्री सांगतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक प्रणित लोक परधर्मीयानच्या तिरस्काराचा, द्वेषाचा धर्म सांगतात. लोकांचे शोषण करणे हे नैतिक धर्माच्या विरोधात असते. आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी धर्माचा जप करत देशातील भांडवलदारांना सामान्यांचे शोषण करण्यासाठी मोकाट रान उपलब्ध करून दिले आहे.
हेच लोक संविधानाच्या प्रियांबलमधील धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काढून टाकण्याच्या मागे लागले आहेत. भ्रष्टाचार हा नैतिक धर्मानुसार अधर्म असतो. भाजपच्या लोकांनी भारतातल्या सर्व पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना स्वतःमध्ये सामावून घेऊन आम्ही कसे नैतिक धर्माच्या विरोधात आहोत हे सिद्ध केलेले आहे.
भाजपच्या काळात देशातील भ्रष्टाचार तसूभरही कमी न होता अनेक पटींनी वाढलेला आहे. कोणत्याही कार्यालयातील काम लाच घेतल्याशिवाय पुढे सरकत नाही. भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये जे लोक आहेत त्यातील बहुतांश लोक गुत्तेदार, दलाल, भ्रष्ट व गुंड लोक आहेत. गुत्तेदार, दलाल, दलबदलू लोकांचा नैतिक धर्माशी तीळमात्रही संबंध नसतो. भाजप गेल्या काही वर्षात अशाच भ्रष्ट दलालांना मिठ्या मारताना दिसतो.
अर्थात इतर पक्षांमधले लोक भ्रष्ट नाहीत असे मुळीच नाही. इतर पक्षांमध्येही अशाच प्रवृत्तीचे बहुतांश लोक आज दिसतात. त्यागी वृत्तीचे लोक राजकारणात आज अभावानेच आढळून येतात. वर्तमानातील राजकारण नैतिकदृष्ट्या अत्यंत हीन पातळीवरती पोहोचलेले आहे. नैतिकतेची साळसूद भाषा करणारे भाजपचे लोक राजकारणाला शोषकता, अंधश्रद्धा, जात्यांधता, धर्मांधता, टोकाची विषमता अशा हानिकारक गोष्टींनी बरबटून टाकत आहेत.
भारतात आज देखील नैतिक धर्माची चाड असलेले लोक खूप आहेत. परंतु असे धार्मिक लोक आज बाजूला पडलेले आहेत. धर्माच्या नावाने राजकारणाचा नफेखोर धंदा करणाऱ्या नीतीभ्रष्ट आणि संग्रहखोर लोकांनी भारतातले सारे राजकारण आपल्या ताब्यात घेतलेले आहे.
नीतीभ्रष्ट धर्मांध व दांभिक लोक राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले असल्यामुळे राजकारणात जनकल्याणकारी समाजकारण कुठलेही उरलेले नाही. राजकारण हे फक्त सत्ताकारण झालेले आहे. धर्माच्या नावाने राजकारण करायचे, लोकांच्या धर्म भावना भडकावून मुस्लिम, ख्रिस्ती धर्मीयांच्या विरोधामध्ये द्वेष पसरवायचा, आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, सत्तेत जायचे, सत्तेत जाऊन भ्रष्ट मार्गाने भरपूर पैसा जमा करायचा, जमा केलेला पैसा आणि संपत्ती सुरक्षित रहावी म्हणून पक्षनिष्ठा खुंटीला टांगून राजकीय वारे फिरेल त्याप्रमाणे निर्लज्जपणे या पक्षातून त्या पक्षात उड्या मारायच्या हे वर्तमान राजकीय पुढाऱ्यांचे वर्तन संपूर्णपणे नीतीभ्रष्ट आणि धर्मभ्रष्ट झालेले आहे.
असे हे नीतीभ्रष्ट आणि धर्म भ्रष्ट लोक सामान्य लोकांनाही भ्रष्ट बनवत आहेत. सामान्य लोकांची मते विकत घेत आहेत. लोकही त्यांच्या भ्रष्ट काव्याला फसून आपले मत विकू लागलेले आहेत आणि लोकशाहीच्या पायावरच कुऱ्हाड मारत आहेत. वर्तमानातील ही स्थिती बदलण्यासाठी खऱ्या नैतिक धार्मिकांनी पुढे येण्याची गरज आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत अलीकडे बोलताना फार नैतिकतेची वगैरे भाषा करतात. परंतु ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ ही वृत्ती त्यांच्या संघटनेत आणि पक्षात मुळीच दिसत नाही. नैतिक धर्माची चाड असलेल्या लोकांनी मी उपस्थित केल्या प्रश्नांची उत्तरे जरूर दिली पाहिजेत.



