दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : भारतीय जनता पक्षात येण्यासाठी अनेकांची तयारी आहे. इतर पक्षातून कोणताही ‘प्रबळ’ कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल तर त्याला पक्षात प्रवेश देण्याची आमची भूमिका आहे. बाहेरून चांगला कार्यकर्ता पक्षात येत असेल तर भाजपचे कार्यकर्ते त्याला समजून आणि सामावून घेतात. यामुळेच भाजप मोठा झाला आहे. एखाद्या ठिकाणी नाराजी येते; पण त्यावेळी आम्ही त्यांना समजून सांगतो आणि ते समजून घेतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठकीतील वक्तव्याने आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली असली तरी, पक्षात प्रवेशाचे दरवाजे सर्वांसाठी खुले नसतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपकडून फक्त विजयी होण्याची क्षमता असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आळंदी शहरात सध्या अनेक स्थानिक नेते, माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत. मात्र, पक्षाने यावेळी “विजय हा एकमेव निकष” ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे केवळ प्रभावी जनाधार, संघटनशक्ती आणि प्रभागातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणाऱ्यांनाच संधी मिळणार आहे.
पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर आढावा घेतल्यानंतर प्रत्येक प्रभागासाठी विजयी समीकरणाचा अभ्यास सुरू आहे. मागील निवडणुकीतील मतांचे आकडे, कार्यकर्त्यांचे जाळे, मतदारांशी असलेला संपर्क आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी या सर्व घटकांचा विचार करून इच्छुकांची निवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, काही स्थानिक इच्छुकांनी “पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा बाहेरून आलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे” अशी नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र, पक्षाच्याजिंकण्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, “भाजपचा उद्देश सत्ता नव्हे, तर विकासासाठी सक्षम नेतृत्व देणे हा आहे. जिंकण्याची खात्री असलेले उमेदवारच पक्षाचे चेहरा ठरतील.”
यावरून स्पष्ट होते की आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीत भाजपची उमेदवारी प्रतिमा, संघटन आणि विजयक्षमतेच्या त्रिसूत्रीवर आधारित असेल. त्यामुळे पक्ष प्रवेशासाठी रांगा लावणाऱ्यांमध्ये आता संभ्रम आणि चढाओढ दोन्ही निर्माण झाली आहे.



