दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : “श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित सुरेश वडगांवकर यांचे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. गेली २५ वर्षे त्यांनी शिक्षण, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात केलेले योगदान मराठा समाजासाठी अभिमानास्पद आहे,” असे प्रतिपादन ह.भ.प.बापूसाहेब महाराज मोरे यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ व जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात अजित वडगांवकर यांना “मराठा भूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना बापूसाहेब मोरे म्हणाले की, “मराठा महासंघ जात-पातीच्या पलीकडे जाऊन कार्य करतो. वडगांवकर हे वारकरी परंपरेतील समतेच्या विचारांना अनुसरून समाजात शिक्षण प्रसाराचे काम करीत आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडतो आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान हा संपूर्ण समाजाचा सन्मान आहे.”
या कार्यक्रमास मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प.चैतन्य महाराज लोंढे, बंकट स्वामी संस्थानचे ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगांवकर, माजी उपनगराध्यक्ष विलासराव घुंडरे, नंदकुमार कुऱ्हाडे, संदीप महाराज लोहर, बाळासाहेब शेवाळे, बाबुलाल घुंडरे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.



