अबोदनगो चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- मेळघाट वनक्षेत्रातील नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी आज मंत्रालयात सातव्या मजल्यावरील दालन क्रमांकात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे माननीय पर्यावरण व वन मंत्री नामदार गणेश नाईक, आमदार रवी राणा, आमदार केवलराम काळे, यशवंत केवलराम काळे तसेच शैलेश म्हाला हे मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तात्काळ अनुकंपा तत्वावर शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश मंत्री श्री. गणेश नाईक यांनी दिले.
तसेच, मेळघाटमधील वन विभागाकडून थांबवण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांना नव्याने गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
थांबवण्यात आलेल्या आणि नव्याने डांबरीकरणासाठी मंजुरी दिलेल्या रस्त्यांची यादी पुढीलप्रमाणे…
बारूखेडा ते झरी
चौराकुंड ते फुकमार
खोकमार ते दतरू
राजापूर ते रेटाखेडा
माखला ते जरीदा
रेस्ट हाऊस ते हरिसाल
कोंगळा ते कळमगुना
केशरपूर ते मालूर
फॉरेस्ट ते जाबळी आर रेंज
या रस्त्यांवर काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मेळघाटच्या आदिवासी भागातील विकासासाठी पुढील महत्त्वाचा निर्णय म्हणजे – बेलकुंड, ढाकणा, हात्रू, तारू, बांदा, माखला, कोकरू, कोलकास, सीमाडोह, घाटांग येथील वन विभागाच्या विश्रामगृहांचे (Forest Rest Houses) आधुनिक दुरुस्ती, रंगरंगोटी आणि सौंदर्यीकरणाचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.
या बैठकीस अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैस्कर, प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर श्रीनिवास, प्रधान मुख्य वनरक्षक (वन्यजीवन) नागपूर, मुख्य वनरक्षक अमरावती, तसेच वनरक्षक व क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प श्री रेड्डी आणि उपवनसंरक्षक अमरावती हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या निर्णयांमुळे मेळघाटातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात संरक्षण आणि आदिवासी भागाचा विकास या दोन्ही बाबतीत शासनाने ठोस पावले उचलली आहेत.



