Home Maharashtra हरीसाल, ता.धारणी येथे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र… — नरभक्षी वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची...

हरीसाल, ता.धारणी येथे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र… — नरभक्षी वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची तातडीची बैठक…

  अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

     दखल न्युज भारत

हरीसाल, ता.धारणी :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या हरीसाल परिसरात वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज वनविभागाची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गेल्या वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात ७ नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली.

               यावेळी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.बळवंतभाऊ वानखडे, मेळघाटचे माजी आमदार श्री.राजकुमार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत परिसरातील गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

       वाघाच्या हल्ल्यांमुळे केवळ मनुष्यहानीच नाही, तर अनेक पाळीव प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे. तसेच, वन्य प्राण्यांकडून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने आदिवासी बांधवांचे जीवन संकटात सापडले आहे. या नुकसानीची योग्य भरपाई तातडीने मिळावी, अशी जोरदार मागणी या बैठकीत करण्यात आली.

          परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षी वाघाला त्वरित जेरबंद करण्यात यावे, ही या बैठकीतील प्रमुख मागणी होती. यासोबतच, वनविभागात काम करणाऱ्या वनमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. सर्व वनमजुरांचा तातडीने विमा काढण्यात यावा आणि त्यांना जंगलात काम करताना आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत, यावरही चर्चा झाली.

         या सर्व गंभीर विषयांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी येत्या पंधरा दिवसांच्या आत प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) आणि वनबल प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

              या बैठकीसाठी उपवनसंरक्षक (DCF) श्रीमती किर्ती जमदाळे, वनविभागाचे इतर अधिकारी, अमरावती जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. महेंद्रभाई गैहरवाल व श्री. दयारामजी काळे, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. रोहित पटेल व श्री. राहुल येवले, श्री. विलासभाऊ बोरेकर, श्री. राजेश सेमलकर, श्रीमती गंगाबाई जावरक, अमरावती ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. पंकज मोरे कालू मालवीय. शेख मुखत्याला. राजकिशोर मालवीय यांच्यासह मेळघाट परिसरातील शेकडो आदिवासी नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.