Home Maharashtra मोदी व फडणवीस अधर्मी,जनतेला दिलेली आश्वासनं विरसले,नरेंद्र मोदी योगी नाही तर सत्ताभोगी:-...

मोदी व फडणवीस अधर्मी,जनतेला दिलेली आश्वासनं विरसले,नरेंद्र मोदी योगी नाही तर सत्ताभोगी:- हर्षवर्धन सपकाळ… — सुरजागडच्या खदानीतून स्वतःची तुंबडी भरण्यासाठी फडणवीसांचा गडचिरोलीत मुक्काम,गडचिरोलीचे फडणवीस स्थान बनवण्याचा डाव. — महाराष्ट्रातील भाजपा युतीचे सरकार चोरीचे,विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करा. — काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत शेतकरी न्याय पदयात्रा व मशाल मोर्चा.

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये 

गडचिरोली :- ना.नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून प्रधानमंत्री पदावर आहेत.पण ११ वर्षात त्यांनी जनतेल्या दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही.मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. 

          स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स,लाखो रुपयांचे कपडे वापरतात,महागड्या वस्तू वापरतात,ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने पूर्ण न करणारे अधर्मी आहेत,असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

       विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करावी यासाठी काँग्रेस पक्षाने आजपासून राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचे निश्चित केले होते.आज गडचिरोलीत प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा व शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली. 

       यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार,खासदार नामदेव किरसान,खासदार प्रतिभाताई धानोरकर,AICC चे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी,माजी मंत्री अनिस अहमद,आमदार अभिजित वंजारी,माजी आमदार सुभाष धोटे,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की,आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात.पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलाईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात.स्टील सीटी करण्याच्या नावाखाली गडचिरोलीतील शेतकरी,आदिवासी,शेतमजूर,स्थानिकांवर सुरा फिरवत आहेत.

         ना.देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोलाचे फडणवीसस्थान करायचे आहे.सुरजागडच्या खदानीला विरोध करू नये म्हणून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खदानीला विरोध करणार नाही,मोर्चात सहभागी होणार नाही असे लिहून घेतले जाते.विरोधात बातमी छापली तर कारवाई केली जाते. 

       मुंबई ही मराठी माणसाची,कष्टकरी,गिरणी कामगारांची होती.पण आज मुंबईत मराठी माणूस दुर्बिण लावून शोधावा लागतो,तीच परिस्थिती गडचिरोलीची होणार आहे. 

        प्रदुषण वाढेल,आपल्या संस्कृतीला धोका पोहचेल आणि या खदानीमुळे स्थानिक लोक हद्दपार होऊन परराज्यातील लोकांचे वास्तव्य वाढेल अशी भिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी व्यक्त केली.

      विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ.विजय वडेट्टीवार म्हणाले की,तिघे भाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ असे भाजपा युती सरकारचे सुरु आहे.शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत.कर्जमाफी देत नाहीत,कर्जमाफीसाठी पैसे नव्हते तर घोषणा का केल्या असा प्रश्न आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी उपस्थित करीत शेतकऱ्यांशी बेईमानी कऱणा-या महायुती सरकारला धडा शिकवावाच लागेल असा इशारा दिला. 

       तद्वतच ते म्हणाले की लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला,२ हजार १०० रुपये देण्याची घोषणा केली.पण आता १५०० रुपयेही मिळणे अवघड झाले आहे,५०० रुपये हातात टेकवत आहेत.सरकार कितीही सांगत असले तरी लाडकी बहिण योजना बंद करण्याचा त्यांचा डाव आहे.भाजपा युती सरकारने शेतकरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे असे वडेट्टीवार म्हणाले….

        या प्रसंगी खासदार डॉ.नामदेव किरसान, खासदार प्रतिभाताई धानोरकर,माजी मंत्री अनिस अहमद,आमदार अभिजित वंजारी,माजी आमदार शुभाष धोटे,डॉ.सतीष वारजूकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले…