दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : “राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सकारात्मक असून आवश्यक त्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आळंदी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी शहराच्या विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नगरपरिषदेच्या वतीने नवीन प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणे, शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकास आराखड्यास मंजुरी देणे, आधुनिक स्ट्रीटलाईट व्यवस्था उभारणे, शहर सुशोभीकरण तसेच विविध मूलभूत नागरी सुविधांसाठी विशेष निधी देण्याची मागणी करण्यात आली.
दरवर्षी लाखो भाविकांचे आगमन होत असल्याने आळंदीतील नागरी सुविधा अधिक सक्षम व दर्जेदार करण्याची गरज असल्याचे नगरसेवकांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. वाढती लोकसंख्या, भाविकांची संख्या आणि भविष्यातील विकास लक्षात घेता विशेष निधीची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित विकासकामांचे सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. आगामी काळात आळंदी शहरातील विविध विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या भेटीदरम्यान नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, गटनेते सचिन गिलबिले, विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, नगरसेवक दिनेश घुले, सोमनाथ कुऱ्हाडे, सुरेश झोंबाडे, रामचंद्र भोसले, सागर कुऱ्हाडे, नगरसेविका ऋतुजा घुंडरे, पूजा घुंडरे, साक्षी कुऱ्हाडे, विजय तापकीर, दिपक काळे तसेच शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.



