Home देशविदेश २५६९ व्या बुद्ध जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!.. — जन्म,बुद्धत्वप्राप्ती,परिनिर्वाण…

२५६९ व्या बुद्ध जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!.. — जन्म,बुद्धत्वप्राप्ती,परिनिर्वाण…

       संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख-शांती-मानवता तथा दु:खमुक्तीचा आर्यसंदेश दिला असे ते दु:खमुक्तीचे मार्गदाता,संपूर्ण दुःख मुक्त महामानव,ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शितल चंद्राप्रमाणे शांत,गंभीर,चतुर आणि निष्कलंक होतं असे ते विश्वशांतीचे निर्माता,विश्वशांतीदूत,विश्ववंदनिय,तथागत भगवान सम्यक सम्बुद्ध…!

 यांच्या २५६९ व्या जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा….!!

बुद्ध जयंती-बुद्ध पौर्णिमा-वैशाख पौर्णिमा…

     जन्म,ज्ञान प्राप्ति व महापरिनिर्वाण.. तथागताच्या जीवनातील या तीनही ऐतिहासिक घटना घडल्या तो दिवस म्हणजे वैशाख पौर्णिमा. 

         आज दि. १२ मे,२०२५ रोजी दरवर्षी प्रमाणे संपूर्ण जगभरात ( म्हणजे जवळपास १८० देशात) २५६९ वी बुद्ध पौर्णिमा अत्यंत थाटामाटात आणि बुद्धाच्या विचारांना प्रमाण मानून जगभरातील बुद्धाचे अनुयायी साजरी करीत आहेत.ही पौर्णिमा मे महिन्यात येते.बुद्ध धम्माच्या अनुयायांसाठी ही सर्वात महत्त्वाची पौर्णिमा आहे.या पौर्णिमेला त्रिविध पावन पौर्णिमा असे म्हणतात. 

       याच पौर्णिमेला महामाया व राजा शुद्धोदनाच्या पोटी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली झाला.

        महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती.सुंदर व मनोरम्य अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच बाळाला जन्म दिला. 

          डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथात केले आहे. ते लिहितात : “पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्त्वाला आपल्या गर्भात धारण केले.तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली.आपल्या पतीला ती म्हणाली, “माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते.” “तुझ्या इच्छेप्रमाणे होईल.” राजाने उत्तर दिले.

        “सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले.देवदहला जात असतांना मार्गात फुलांनी बहरलेल्या वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय.

        लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वप्नातील अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानाविधरंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते. 

         आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजुळ स्वरालाप काढीत होते.तेथील मनोरम्य दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणा-या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या खाली नेऊन उतरविण्यास व तेथे थांबण्यास सांगितले.

       महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्यापाशी चालत गेली.त्या शालवृक्षाच्या फांद्या वा-याच्या झुळूकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले.

      सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली.इतक्यात ती आपल्या पायाच्या बोटांवर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली.तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली,आणि अशाप्रकारे हालल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या.

       शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला.त्या मुलाचा जन्म इ.पू. ५६३ व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला. 

      शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती.परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते.आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला.

          पुत्रजन्माच्या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती.अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. याच वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हा वयाच्या ३५ व्या वर्षी गया येथे निरंजना नदीच्या काठी असलेल्या उरूवेला वनामध्ये पिंपळवृक्षाखाली बसला असताना बुद्ध झाला.सिद्धार्थ गौतमास वैशाख पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी दुःखमुक्तीचे ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या मनातील अंधःकार पूर्णपणे दूर झाला व तो सम्यक संबुद्ध झाला.याच दिवशी सिद्धार्थ गौतमाला चार आर्यसत्यांची अनुभूती झाली.

       “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या बुद्ध बनण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर विवेचन केलेले आहे. 

      याच पौर्णिमेच्या दिवशी इ.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शाल वृक्षाखाली या पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी मनाच्या जागरूक अवस्थेत समाधीचा अभ्यास करताना बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले.  

       बुद्धाच्या जीवनात जन्म, बुद्धत्वप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत.निसर्गातील अत्यंत दुर्मिळ अशाच या घटना आहेत. या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्यामुळे या पौर्णिमेस त्रिविध पावन पौर्णिमा असे म्हणतात.

        हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे व तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला पाहिजे. प्रत्येकाने आपले घर स्वच्छ केले पाहिजे,सजविले पाहिजे, गोडधोड करून इतरांना वाटले पाहिजे,मित्रांना व नातेवाईकांना आपल्या घरी आमंत्रित केले पाहिजे.मुलांसाठी नवीन कपडे केले पाहिजेत. 

      अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या त्रिविध पावन पौर्णिमेच्या दिवशी अष्टशीलाचे पालन केले पाहिजे.संपूर्ण बुद्ध विहारे व धम्म प्रशिक्षण संस्था यांनी धम्म कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत.विहारे सजविली पाहिजेत.धम्म प्रवचने आयोजित केली पाहिजेत व मने उत्साहाने व आनंदाने ओतप्रोत भरलेली असली पाहिजेत.

       सणांच्या दिवशी मंगल, सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहीत करणा-या भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची स्मृती जपण्यासाठी सण साजरे केले जातात. 

       सणांच्या दिवशीच्या भूतकाळातील घडामोडींपासून बोध घेऊन त्यानुसार स्वतःचे जीवन घडविण्यासाठी सण साजरे केले जातात. 

        तथागत बुद्धाने आयुष्यभर शील,समाधी व प्रज्ञेचा मार्ग शिकविला.त्याने करूणा विकसित करण्याचा व समता, स्वातंत्र्य व बंधुत्व यावर आधारित जीवन जगण्याचा धडा लोकांना दिला. 

       त्यामुळे प्रत्येक बुद्ध सणाच्या दिवशी शीलांचे काटेकोरपणे पालन करणे व काया,वाचा व मनाची आपली कृती निष्कलंक व कुशल राहील याची खबरदारी घेणे निकडीचे आहे. सर्व सणांच्या दिवशी प्रत्येकाचे वर्तन हे बुद्धाच्या शिकवणूकीशी सुसंगत असेच असले पाहिजे. 

     या दिवशी धम्म प्रवचने,धम्म कार्यशाळा वेगवेगळ्या भागांमध्ये आयोजित केल्या पाहिजेत आणि लोकांनी धम्म शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे,जेणेकरून ते स्वतःच्या व इतरांच्या हितासुखासाठी प्रयत्नरत राहतील.सर्व बारा पौर्णिमा बौद्धांचे सण आहेत. 

             तथागत बुद्धांच्या जीवनातील महत्वाच्या घटना पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत.बुद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला वेगळे असे महत्व आहे.या सर्व दिवशी उपोसथ म्हणजेच अष्टशीलाचे गांभीर्याने पालन केले पाहिजे. 

      त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्व समजून घेणे आवश्यक आहे.

    २५६९ व्या बुद्ध जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!..

लेखक :- कपिल भीमराव कांबळे

            तथा

दखल न्यूज भारत परिवार..