राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याची जयंती साजरी…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

           साकोली – नंदलाल पाटील कापगते विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथे स्वराज्याला पहिले छत्रपती देणाऱ्या राजमाता जिजाऊ व युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची ठिणगी पाडणारे तेजस्वी युगपुरुष म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम विद्यालयात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

     या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक के एस डोये सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. के जी लोथे, प्रा. बी.पी.बोरकर,डी.एस.बोरकर, प्राध्यापिका स्वाती गहाणे , सौ आर बी कापगते व इतर मान्यवर उपस्थित होते. 

    कार्यक्रमाची सुरुवात नियोजित अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. 

   याप्रसंगी के.जी. लोथे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तुत्वाचा वसा घेतात. पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजांच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या, या संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकताच जिजाऊंनी त्यांना राजनीतिही शिकविली,असे मौलिक विचार लोथे यांनी व्यक्त केले. 

    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक के.एस.डोये म्हणाले, जिजामाता स्वराज्याची स्फूर्ती होत्या, महासक्ती होत्या, मातृशक्ती होत्या. गरजवंत रयतेला सदैव मदतीसाठी तत्पर असत. जिजाऊ ह्या प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्यागांजल्यांच्या पालनकर्त्या राजमाता होत्या. कर्तुत्वात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे प्रत्यक्ष प्रसंगाला सामोरे जात असत, असे मौलिक विचार अध्यक्ष मनोगतातून डोये यांनी व्यक्त केले. 

    याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित भाषणे व गीते सादर केले, तसेच विद्यालयातील शिक्षिकेंनी सुद्धा सुंदर असे गीत हार्मोनियम, तबला यांच्या लयबध्द तालावर सादर करून राजमातेला वंदन केले. शालेय विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा केली होती. 

   कार्यक्रमाचे संचालन सौ. एस.एन.क-हाडे यांनी तर आभार प्रदर्शन आर. व्ही. दिघोरे यांनी केले. 

  कार्यक्रमाचे यशस्वीते करिता सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.