दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर संबंधित विभागांनी वार्डानुसार मतदार याद्या तयार करताना अनेक ठिकाणी विसंगती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
नवीन प्रभागनिहाय विभागणीसोबत मतदार याद्याही फोडण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात गेल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या वार्डात दाखल झाले असल्याचेही उदाहरण समोर आले आहे. तसेच शेजारील गावांतील काही नागरिकांची नावेही आळंदीच्या मतदार यादीत आढळून आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावरून स्थानिक नागरिक आणि राजकीय इच्छुकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “निवडणूक प्रक्रियेपूर्वी प्रशासनाने या त्रुटी दुरुस्त करून अचूक व अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध करावी,” अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राहूल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली आहे.
यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले की नगरपरिषद कार्यालयामध्ये सोमवार (ता.१३) पर्यंत अर्ज उपलब्ध केले आहेत. ज्या निवासस्थानी राहतो त्या ठिकाणचा पुरावा आणि आधार, मतदार नोंदणीचे कार्ड, वीज बिल कर भरल्याची पावती, मिळकत उतारा सोबत जोडावा लागेल.
सोमवारपर्यंत ही हरकत अर्ज भरून घ्यावी लागेल. त्यानंतर नगरपरिषदेने १० पथक तयार केले असून प्रत्येक पथकात चार कर्मचारी असतील. हे पथक आलेल्या हरकत अर्जाची स्थळ पाहणी करतील आणि हरकत अर्ज, स्थळ प्रांत अधिकारी यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी पाठवतील. या हरकतींवर अंतिम निर्णय प्रांत अधिकारी घेणार आहे असे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील हा गोंधळ उमेदवार आणि पक्षांसाठीही डोकेदुखी ठरत असून, आळंदीतील निवडणुकीच्या वातावरणात या प्रकरणामुळे नवचर्चा रंगू लागली आहे.



