Home Social माऊलींच्या सुवर्ण कलशासाठी ११.२३ लाखांची सेवा अर्पण…

माऊलींच्या सुवर्ण कलशासाठी ११.२३ लाखांची सेवा अर्पण…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त संजीवन समाधी मंदिरावर ११ किलो सुवर्ण कलश उभारण्याचा ऐतिहासिक संकल्प पूर्णत्वास जात आहे. या पवित्र कार्यासाठी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत तब्बल ₹११,२३,६२६ रुपयांची सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करण्यात आली. “एक हात सेवेचा” या उपक्रमाअंतर्गत संस्थेचे सर्व घटक, जैन संघटना, सामाजिक व औद्योगिक मंडळांनी सहभाग घेतला.

या सेवेत :–

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था : ₹८,२६,३९३

श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ : ₹१,११,१२१

जलाराम सत्संग मंडळ : ₹१,११,१११

इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशन : ₹७५,००१

अशी एकूण रक्कम सुपूर्द करण्यात आली.

          समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ.नारायण महाराज जाधव यांनी भूषविले. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा), ॲड. राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, मा.नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, शारदाताई वडगांवकर, मा.उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, चेअरमन बाबुलाल घुंडरे, नंदकुमार वडगांवकर, शिरीष कारेकर तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        प्रारंभी माऊलींचे पूजन करून प्रमुख विश्वस्तांचा शाल, नारळ, मोत्यांची माळ व प्रतिमा देऊन सन्मान झाला. प्रास्ताविकात सचिव अजित वडगांवकर यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षातील महत्त्वपूर्ण उपक्रमांचा आढावा घेत सुवर्ण कलशारोहण हा या कार्याचा कळस असल्याचे नमूद केले.

          विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी “दारात सोन्याचा पिंपळ” या म्हणीप्रमाणे मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कलश असावा, हा संकल्प भक्तांच्या सहकार्यातून साकारत असल्याचा आनंद व्यक्त केला. संस्थानच्या वतीने सर्व दात्यांचा सन्मान करून आभार मानण्यात आले. समारंभाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले, तर माऊलींच्या पसायदान पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.