ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणारा व फरार झालेल्या नराधम डॉ. देवेश अग्रवाल यांना तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कार्यवाही करावी याविषयी ( शुक्र. ११ जुलैला ) शिवसेना साकोली सेंदूरवाफा तर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक साकोली यांना निवेदन देण्यात आले. या डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना घडताच जनतेत संतापाची लाट उसळली आहे. दूसरीकडे आरपीआयचे अचल मेश्राम यांनी सुद्धा एसडीओ अश्विनी मांजे यांचे मार्फत केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, न्याय मंत्री व पोलीस महासंचालक यांना निवेदन देत आरोपीला अटक करून कारवाई करण्यासाठी निवेदन सादर केले आहे.
शहरातील उच्चभ्रू व नामांकित असलेल्या श्याम हॉस्पिटलचे डॉ. देवेश अग्रवाल यांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ०९ जुलैला सोनोग्राफी कक्षात अर्धा तास अश्लीलतेचे गैरकृत्य केले. मुलीने घरी वडीलांना सांगताच पिडीत मुलीच्या आईने साकोली पोलीस ठाणे गाठले व डॉक्टर विरोधात १० जुलैला तक्रार दाखल केली. याचे संतप्त पडसाद साकोलीत उमटले. शिवसेना शिंदे गटाने शुक्रवारी साकोली पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. यामध्ये नमूद केले आहे की, जे कृत्य या डॉक्टरने केले ते धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रात अगदी अशोभनीय कृत्य आहे. हे धनाढ्य परीस्थितीचे आरोपी असून हा डॉक्टर फरार झाला आहे. सदर संतापजनक गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी डॉक्टरला तातडीने अटक करण्यात यावी. त्याचेवर उच्च स्तरीय चौकशी होऊन पिडीतेला न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना साकोली तालुका प्रमुख राधेश्याम मुंगमोडे व शहरप्रमुख नरेंद्र वाडीभस्मे यांनी दिला. यावेळी पोलीस ठाणे बाजूला एका दूकानात शिवसैनिकांनी चर्चेत म्हणाले की या धनदांडग्या डॉक्टर आरोपीच्या बचावासाठी शहरातील काही धनदांडगे तथाकथित प्रसिद्ध दलाल सक्रिय झाल्याचे समजले आहे, हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे, याचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा. अन्यथा शिवसेनेचा साकोली शहरासह जिल्ह्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा संत लहरीबाबा मठ देवस्थान समोर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असतांना हा इशारा येथे दिला. हे निवेदन सादर करतेवेळी प्रामुख्याने उपजिल्हा प्रमुख बंडूभाऊ शेंडे, साकोली वि. स. संघटक उमेद गोडसे, वि. स. संपर्क प्रमुख सुरेश गजापुरे, उपतालुका प्रमुख सचिन घोनमोडे, युवा सेना तालुका प्रमुख पुष्कर करंजेकर, वाहतूक सेना प्रमुख सुमित लंजे, युवा सेना शहरचे विवेक काशिवार, विनायक देशमुख, अरुण राऊत, निशांत कुडेगावे, विशाल कोसरे, धम्मशील वैद्य, प्रेमराज सोनवाने, किशोर बावणे आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
या घटनेत रिपब्लिकन पक्षाचे अचल मेश्राम यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री व पोलीस महासंचालक यांना निवेदन देत त्या डॉक्टरला अटक करून उच्च कारवाई करण्याची मागणी करीत जनआक्रोश आंदोलनाचा इशारा दिला आहे. यात रिपब्लिकन सेनेचे विदर्भ सचिव अचल मेश्राम, जिल्हा अध्यक्ष युगांतर बारसागडे, भंडारा प्रभारी मनोज खोब्रागडे, तनुजा नागदेवे, मनिषा खोब्रागडे, गिता वलथरे, मंगला तिरपूडे, कोकिळा रामटेके, प्रबोधनकार भावेश कोटांगले, पराग रामटेके, बबिता राऊत, मोहन बोरकर यांसह आरपीआय, वंचित बहुजन आघाडी व सर्व आंबेडकरी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनेचे सुमारे शंभराहून अधिक कार्यकर्ते पोलीस ठाणे व तहसिल कार्यालयात उपस्थित होते.
या प्रकारावर काय म्हणाली जनता…
साकोलीत या संतप्त घटनेत डॉक्टरी पेशाला काळीमा फासणा-या घटनेनंतर साकोली सेंदूरवाफा शहरातील चौकाचौकात त्या नराधम डॉक्टराचा परवाना रद्द करा, अटक करून शिक्षा सुनावली पाहिजे अश्या विविध जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर शहरातील प्रतिष्ठित वैद्यकीय डॉक्टरांनी असे सांगितले की, ह्या माणूसकीला काळीमा फासणा-या वैद्यकीय नाव बदनाम करणा-या संतापजनक घटनेमुळे इतर आम्ही सर्व वैद्यकीय डॉक्टरांचे नाव बदनाम व मलिन होत असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे अशी प्रतिष्ठीत डॉक्टरांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.



