डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ.सिध्दार्थ धेंडे हे १३२ निराधार विद्यार्थ्यांचे घेणार शैक्षणिक पालकत्व…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : निराधार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासाठी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेतला आहे.

१३२ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी डॉ. धेंडे यांनी घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हा संकल्प केला असल्याचे डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

आई वडिलांचे लहानपणीच छत्र हरविल्याने अनेक मुलांचे आयुष्य भरकटले जात आहे. त्यांना शिक्षण, नोकरी, योग्य जगण्याचे मार्गदर्शन होत नाही. परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत आहे. समाजाची एक पिढी नाहक गैरमार्गाला लागण्याची शक्यता असते. लोकप्रतिनिधी या नात्याने काम करत असताना विविध ठिकाणी फिरताना ही परिस्थिती निदर्शनास येत आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षणाविषयी आधार देण्याचा मानस केला होता. सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचा सर्वत्र माहोल आहे. त्या निमित्त अनेक सामाजिक उपक्रम माझ्या पुढाकाराने आयोजित केले जात आहेतच. मात्र यंदा १३२ निराधार विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलणार असल्याचे डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी सांगितले. 

जून महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. त्या वर्षापासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.त्यासाठी निराधार विद्यार्थ्यांच्या पालकांनी नागपूर चाळ येथील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.तसेच ९६८९९३४२८४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन, डॉ.धेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.