Home देशविदेश माणूस आणि रोबोट…

माणूस आणि रोबोट…

       भांडवलशाहीचे विकासाचे टोक म्हणजे ‘ रोबोट ‘ होय.भांडवलशाही ने आधी जिवंत माणसालाच यंत्रमानव समजून त्यांचेकडून बारा बारा तास काम करून उत्पादनाची कामे करून घेतली.भांडवलशाही माणसाला मेंदू आणि मन आहे,हे मान्यच करीत नाही,तर त्यास केवळ मनगट आहे,शरीर आणि त्याची अवयव आहेत,त्यांचा वापर धन संपती निर्माण करण्यासाठी करायचा असतो,एव्हढेच भांडवलशाहीला कळते.कष्ट कर्मा पलीकडे पण माणसाचे जीवन आहे,हे भांडवलशाहीस माहित नसते.माहीत असले तरी ते मान्य नसते.म्हणूनच भांडवलशाही जिवंत माणसाला यंत्र समजून त्यांचेकडून भांडवली वस्तू साधने संपती म्हणजे शेती कारखाने त्यातून वस्तू निर्मिती त्याचे वितरण विक्री ,तसेच पैसा, जड जवाहर,माणिक मोती,सोने चांदी,हिरे , बंगले,राजवाडे इत्यादी माणूस नावाच्या यंत्रमानाकडून बनून घेते,भांडवल निर्माण करते ,तिचे ग्राहक,विक्रेते निर्माण करते,त्यासाठी बाजार व्यवस्था निर्माण करते ती म्हणजे भांडवलशाही होय.

    भांडवलशाहीचे वैशिष्ट्ये म्हणजे वस्तू निर्मिती,वाटप ,विक्री आणि खरेदी हे असले तरी तिचा मूळ हेतू,या बाजार व्यवस्थेतून ग्राहकांची पिळवणूक करून,काळाबाजार,साठवणूक,अडवणूक,टंचाई निर्माण करून नफा कमावणे,म्हणजेच अनितीने ग्राहकाची पिळवणूक करून पैसे कमावणे आणि आपले भांडवल ( पैसा,धन,संपती,प्रॉपर्टी ) वाढविणे, हे भांडवलशाहीचे आणि भांडवली व्यवस्थेचे वैशिष्ट्ये आहे.थोडक्यात सांगायचे तर आर्थिक विषमता ” हे या भांडवलशाहीचे धेय्य असते.त्यासाठी भांडवली लोकशाही किंवा भांडवली हुकुमशाही असलेली सत्ता स्थापन करणे,अशी सत्ता ( सरकार,शासन,प्रशासन ,कायदे ) की जे भांडवलशाही व्यवस्थेची काळजी घेईल,तिचे जतन करेल.

      भांडवली सत्ता आणि व्यवस्था टिकवण्यासाठी जात धर्म देव हे तीन फॅक्टर भांडवलशाही साठी अत्यंत उपयोगी आहेत,म्हणून या तीन संकल्पना टिकून राहण्यासाठी चे प्रयत्न ही भांडवलशाही सतत करताना दिसते.म्हणूनच जमीनदार कारखानदार आणि महंत महाराज बुवा कथाकार कीर्तनकार या तिघांची मिलीभगत ( दोस्ती ) असते.हे तिघे मिळून सामान्य जनतेचे ब्रेन वॉशिंग ( बुद्धिभ्रम ) करीत असताना दिसतात.

     या तिघांनाही आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आर्थिक सामाजिक विषमता टिकविणे अत्यंत गरजेचे असते,म्हणून ही देव दैव पुनर्जन्म आत्मा,स्वर्ग , नरक,पावित्र्य या संकल्पना लोकात रुजविण्याचा प्रयत्न करीत असतात.ते साहित्यातून पण.

     आपले वर्चस्व कायम असावे म्हणून सत्ता संपती प्रतिष्ठा याची जपवणूक करणे हे यांचे उद्दिष्ट असते.” विषमता हा विचार,विषमतावादी व्यवस्था हे ध्येय,सत्ता संपती प्रतिष्ठा हे उद्दिष्ट,देव दैव,धर्म जात हे माध्यम आणि कथा कीर्तन कर्मकांड अंधश्रद्धा ही भांडवलशाहीचे साधने आहेत.

     जिवंत माणसाला बुद्धी मन नाही ,असले तरी ते विकसित होऊ द्यायचे नाही,त्याचे मनगट,शरीर पण विकसित होऊ द्यायचे नाही,म्हणून त्यास सकस अन्न द्यायचे नाही,बेरोजगारीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर कायम ठेवायची,त्याचे शरीर मनगट मजबूत होऊ द्यायचे नाही,आपल्या कामी येईल तेव्हढीच शक्ती त्याच्या बुद्धीत,मनात,मनगटात ठेवायची,ही दुष्ट निती भांडवल शाही ची असते,म्हणून शिक्षण फक्त टेक्निकल द्यायचे,विचार करायला लावणारे ,आणि संस्कार म्हणजे समतेचे शिक्षण ,आणि दर्जेदार आरोग्य माणसास द्यायचे नाही,हे धोरण भांडवलशाहीचे असते.या धोरणास जेंव्हा विरोध होतो,तेंव्हा ही भानवलशाही यंत्रमानवाचा वापर सुरू करते.हे अनेक रोबोट शेती,घर,कारखाने,कंपन्या,कार्यालये, एव्हढेच नव्हे तर सीमेवरची लढाई पण हे रोबोट करायला लागतात.अशावेळी माणसाचे काहीच काम नसते,परंतु त्याला आपल्या चरितार्थासाठी साधने किंवा नोकरी हवी असते,ती ही माणसे या भांडवलशाही व्यवस्थेत गमावलेली असतात,म्हणून आता लढाई सुरू होते, ती सजीव माणूस आणि निर्जीव माणसातच.रोबोट आणि माणूस जेव्हा ही लढाई लढेल,तेंव्हा कोण कुणाला जिंकतो,ते आपण पहातच राहू.कारण आता यापेक्षा वेगळे काही करण्याची धमक आपल्यात राहिलेली नाही.आपण मतदार राजा म्हणून हरलो आहोत,कारण आपण आपल्या मताची विक्री केली आहे.नव्हे आपणच आपल्याला विकले आहे.म्हणूनच आपण माणसाचे रोबोट झालो.

      लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 11 जानेवारी 2026,फोन : 9420912209.