Home Social श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व लिपिकांचा जिल्हा गुणवंत पुरस्काराने सन्मान..

श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व लिपिकांचा जिल्हा गुणवंत पुरस्काराने सन्मान..

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, प्रामाणिकता आणि निष्ठेच्या बळावर आपला ठसा उमटवणाऱ्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी या संस्थेच्या प्राचार्य, शिक्षक व लिपिक यांना यंदा खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक – शिक्षकेतर संघाच्या वतीने जिल्हा गुणवंत पुरस्कार जाहीर करून सन्मानित करण्यात आले.‌

         या पुरस्कारांतर्गत प्राचार्य सूर्यकांत गुलाब मुंगसे यांनाजिल्हास्तरावर “जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक”, साहेबराव सोपान वाघुले यांना “जिल्हा गुणवंत शिक्षक” तसेच ज्येष्ठ लिपिका संगीता श्रीधर पाटील यांना “जिल्हा गुणवंत सेवक” या पुरस्काराने गौरविण्यात आले.

          शिक्षणाच्या क्षेत्रात नवकल्पनात्मक दृष्टिकोन, दूरदृष्टीपूर्ण नियोजन व संघटनात्मक नेतृत्व या गुणांचा संगम प्राचार्य मुंगसे यांच्या कार्यकिर्दीत दिसून येतो. विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठीही त्यांनी विविध उपक्रम राबवले. त्याच्या फलस्वरूप शाळेला SQAAF सर्वेक्षणात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवण्याचा मान मिळाला. या कर्तुत्वाला अधोरेखित करून त्यांना ‘जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक’ हा सन्मान बहाल करण्यात आला.

         याचबरोबर निष्ठा, मेहनत आणि प्रामाणिक कार्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या साहेबराव वाघुले यांना ‘जिल्हा गुणवंत शिक्षक’ तर दीर्घकाळ सेवेत राहून शाळेच्या कार्याचा आधारस्तंभ ठरलेल्या संगीता पाटील यांना ‘जिल्हा गुणवंत सेवक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

           या पुरस्कारप्राप्तांचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेचे सचिव अजित सुरेशराव वडगावकर, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस यांच्यासह सर्व शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी प्राचार्य मुंगसे, शिक्षक वाघुले आणि लिपिका पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.