Home Maharashtra अखिल भारतीय मराठा महासंघाचा “मराठा भूषण” पुरस्कार संजय घुंडरे यांना जाहीर….

अखिल भारतीय मराठा महासंघाचा “मराठा भूषण” पुरस्कार संजय घुंडरे यांना जाहीर….

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

मुंबई : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ व्या वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बहुजन समाजासाठी कार्यरत व अध्यात्माच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडविणारे भाजप आध्यात्मिक आघाडीचे संजय सुभाषराव घुंडरे (पाटील) यांना “मराठा भूषण” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

        शुक्रवार (दि.१२) रोजी हा पुरस्कार डॉ.नारायण महाराज जाधव यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हभप बापूसाहेब महाराज मोरे हे भुषविणार आहे.

        संजय घुंडरे यांनी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या समाज प्रबोधनाच्या परंपरेला अनुसरून अध्यात्माच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य हाती घेतले. वारकरी परंपरेतील निस्वार्थी सेवाभाव, भक्ती आणि समाजहिताचे ध्येय घेऊन त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यातून बहुजन समाजाला दिलासा, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली.

        अ.भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना, “संजयदादांनी आपल्या त्याग, समर्पण आणि प्रामाणिक सेवेमुळे समाजाच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांचा गौरव मराठा भूषण पुरस्काराने करणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे नमूद केले.

       त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य अध्यात्मिक व वारकरी विभागाचे अध्यक्ष बबुवान शेंडगे पाटील यांनी सांगितले की, “संत परंपरेला वाहिलेल्या या कार्यामुळे घुंडरे यांचे योगदान अतुलनीय ठरते. समाज प्रबोधनाची परंपरा त्यांनी जिवंत ठेवली आहे. महासंघ त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा अर्पण करतो.”