Home देशविदेश वर्धा नदीवरील दगडी पुलाचा इतिहास…. 

वर्धा नदीवरील दगडी पुलाचा इतिहास…. 

     शब्दांकन

   प्रा.डाॅ.रवी दलाल

       संकलन

 विद्रोही अविनाश गोंडाणे..

       भारतात इंग्रज राजवट होती त्यावेळी दळणवळणासाठी त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या.

        पोलिस स्टेशन,रेल्वे स्टेशन,दवाखाना,विहीर,शाळा,मुसाफिरखाना,दगडीपुलअश्या अनेक इंग्रजकालीन वास्तु चांगल्या स्थितीत उभ्या आहेत.

       वर्धा व अमरावती जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचा इतिहास पाहणार आहोत.

        प्रवास करतांनी हजार वेळा तरी या पुलावरून आपण प्रवास केला असेल.त्याच पुलाच्या जन्म इतिहासाला उजाळा देत आहोत.फोटोतील इंग्रजकालीन पुल वर्धा नदीवरचा आहे.जिल्हाचे दोन भाग करणाऱ्या पुलाची कहाणी माहिती व्हावी म्हणून मी लिहिली आहे.

        अमरावती जिल्ह्यातील शेवटचं गाव भारवाडी पार केले कि वर्धा नदीचे पात्र दिसते.दोन जिल्ह्याची विभागनी करणाऱ्या किंवा जोडणाऱ्या नदीचे खरे नाव वरदा आहे. 

       पण आपण वर्धानदी उच्चारतो.अगदी सुरुवातीच्या काळात वर्धा नदीवर मातीदगडाचा बंधारा होता.त्यांवरून पायदळ,घोडदळ,बैलजोडीची वहिवाट होती.पावसाळ्यात पुरामुळे गावातील संपर्क तुटायला कि डोंग्याची सोय तेवढी होती. 

        पण उफनत्या नदीतुन डोंग्यातुन‌ प्रवास करने धोकादायक होता. म्हणुन भोई डोंगा टाकतं नव्हते.डोंगा वाहु नये म्हणून काठावर ठुणीबांधुन ठेवायचे.

        वर्धा नदीचा प्रवाह आजही तितकाच धोकादायक आहे.1991 साली मोवाड गाव वर्धा नदीनेच पोटात घेतल‌ होतं. आज पर्यंत पुरात कितीतरी लोकांना जलसमाधी मिळाली.परतोडा गांवचा व्यापारी बैलबंडी सोबत वाहून गेला.दलपतपुरची लग्न वरात भांडयाकुडया सोबत डुबली,अश्या अनेक दुःखद घटना घडल्या.त्याची नोंद नाही.

                                  मग इंग्रज सरकारने वाहतुकीच्या दृष्टीने पुल बांधण्याची योजना आखली.या करिता जॉर्ज फॅब्रिक इंजिनिअरची निवड करण्यात आली.यांच्या टिमला वर्धेवरुन मातीपरिक्षण करिता बोलविण्यात आले.

         हि पाहणी नदीचे पात्र कोरड असतांना झाली होती.तेव्हा पुलावर मोलमजुरी करणारे चंपतराव गाडगे यांनी मला सांगितले.त्यानंतर 1914 मध्ये पुल बांधकामाला सुरुवात झाली.इंग्रजांनी बाहेरून मजूर आणले नाही.फक्त मिस्त्री आणि इंजिनिअर आणले.

       खेड्या पाड्यातील तरुणांना 

पोलिसपाटील कोतवालानी दोंवडी देवून एकत्र केले होते.हि दंवडी भिष्णुर गावात पण झाली होती.पुल कामासाठी प्रत्येक गावातील बाया माणसं मोल मजुरीला लागले.जो तरुण फक्त दगड मातीच काम करायचा त्याला एक रुपया.ज्याच्या जवळ बैलबंडी आहे त्याला दीड रुपया मजुरी होती. 

        दुपारी पाण्यात फुगलेले चने इंग्रजांकडून नियमित मिळायचे. इंग्रज अधिकारी घोड्यावरुन येवून पुलाची पाहणी करायचे.मोठे अधिकारी मेन्यातुन फेरी मारायचे-गाव कोतवाल पोलिस पाटीलावर मजुर आणण्याचा जुम्मा होता.भारसोडा,भारसवाडी, विष्णूर,परतोडा,खडका,खडकी वरखेड,तारखेड,जळगाव,जुनी भरवाडी,चिस्तुर,फत्तेपर तळेगाव,आष्टी अश्या अनेक गावातील बाया माणसांना काम मिळाले.खडीचुना वर्धेवरुन यायचा,बांधकामाला सुरुवात झाली.

      पुलासाठीचा लागणारा दगड वर्धा नदीच्या पात्रातुनच काढण्यात आला.दगड फोडून आकार देण्यासाठी कारागीर मंडळी नदीकाठी पाल टाकून राहायची.एकुन बारा बैलघाने चुनाघोटाई कामाला लागले. चूनखडी,शिसम,जवसतेल, डिंग,उळीददाळ, झाडांची साल, घालून चक्री मसाला तयार करायचे.त्यापासूनच पुलाची जुडाई करण्यात आली.

        पुलाचे बांधकाम 

वर्धेकडुन अमरावती कडे सुरू झाले.शेवटी दगड कमी पडला म्हणून भारसोडा भागातील नदी खोदुन दगड काढण्यात आले.यासाठी गजगोटा शक्तिशाली बारुदाचा वापर करण्यात आला होता.दगड आणण्यासाठी अनेकांच्या बैलबंड्या कामी लागल्या. त्यामध्ये भिष्णुर गावचे चंपतराव यशवंत गाडगे यांची बैलबंडी होती. 

          बांधकामासाठी मोठमोठे दगड काढण्यात काढल्याने नदीत मोठा खड्डा झाला.त्याला आता वर्धा नदीचा डोह म्हणतात.दगड तराशीचे काम नियमित तब्बल दोन वर्षे चालले. 

       पंचवीस खड्डे करायला एक दिड वर्षाचा करण्यासाठी कालावधी लागला.पावसाळा सुरू झाला कि चार महिने काम बंद राहायच.दगडाचे,कोरीव काम पश्चिम बंगाल मधुन‌ आलेले कारागीर करायचे.सारख्या अंतरावर पंचवीस खड्डे खोदून पुलाचा पाया घातला.

      जुन्या पुलावर जाऊन पहा पंचवीस कमानी खालुन‌ नदी वाहते-बाराव्या कमानीवर दगडी शिलालेख आहे.त्यावर बांधकाम वर्ष इंजिनियरचे नाव ऐकुन खर्च लिहिलेला आहे.पुलाला एकुण किती खर्च लागला हे स्पष्ट दिसत नाही.काही लोकांनी खरपावर कुऱ्हाडीला धार लावुन मजकूर नष्ट केला.

       पूल बांधायला एकूण साडेचार ते पाच वर्षाचा कालावधी लागला.पुलावर मजुरीचे काम करणाऱ्या दोन‌-तीन लोकांची मी 1990 मध्ये भेट घेतली.त्यापैकी चंपतराव यशवंत गाडगे भिष्णुर यांची भेट घेतली–त्यानीच हि माहिती दिली.

       चंपतराव यशवंत गाडगे यांनी बैलबंडीतून‌ दगड आणण्याचे‌ काम चार वर्ष केले.आता घडीला पुलाचे आयुष्य 110 वर्षाचे आहे तरी पुराचा सपाटा सहन करतो.1917 मध्ये बनविलेला पुल आजही चांगल्या स्थितीत आहे. 1917 ते 2026 म्हणजे 110 वर्ष होवूनही पुल मजबूत आहे.सुरक्षेच्या दृष्टीने 1990 पासून वाहतूक बंद करण्यात आली.1989-90 साली पहिला मोठा पूल अगदी बाजूला बांधण्यात आला.

     त्यानंतर 2004-5 मध्ये पुन्हा दुसरा पूल बांधण्यात आला अशाप्रकारे वर्धा नदीवर आता तीन पुल आहेत.ह्या पुलाचे बांधकाम झाल्यानंतर तिवसा रेस्टहाऊस,पोलीस स्टेशन,मुसाफिरखाना प्रायमरी शाळा पिंगळा नदिवरील पुलाचे बांधकाम झाले. 

      आता तिवसा शहरामध्ये इंग्रजकालीन चार वास्तु उभ्या आहेत पोलिस स्टेशन,रेस्टहाऊस,पिंगळा नदीचा पूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- ग्रामीण रुग्णालया जवळ असलेला मुसाफिर खाना-रोड रुंदीकरणाच्या वेळी 1980 मध्ये पाडण्यात आला.

        शब्दांकन

प्रा.डॉ.रवि दलाल,तिवसा….

             संकलन 

    विद्रोही अविनाश गोंडाणे..

      अमरावती ९९२३२६४१९३…