ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) जमनापुर/साकोली येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या भारती व्यास, प्रमुख उपस्थिती शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोड़ीचोर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले.
महावीर जयंतीनिमित्त शाळेत चित्रकला, निबंध लेखन, आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विविध स्पर्धेसाठी जवळपास ५२३ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित विचार मांडले आणि आपल्या कलाकृतींमधून अहिंसा, संयम व सत्य या मूल्यांचं महत्त्व अधोरेखित केलं.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या भारती व्यास यांच्या भाषणाने झाली. त्यांनी भगवान महावीर यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना, विद्यार्थ्यांना “अहिंसेच्या मार्गाने जगण्याचा” संदेश दिला. त्यानंतर विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी महावीर स्वामींच्या विचारांवर आधारित संक्षिप्त भाषणं सादर केली.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंगसंगती आणि कल्पकतेच्या जोरावर अद्भुत चित्रं साकारली. निबंध स्पर्धेत”भगवान महावीर यांचे विचार आणि आजचं युग” हा विषय होता, ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी प्रभावी लेखन केलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महावीर स्वामींच्या विचारांची रुजवणूक झाली. या कार्यक्रमासाठी नवजीवन शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया आकरे यांनी केले.



