पुणे भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : जनता पक्षाचे दौंड तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय राजाराम ताकवणे यांचे चिरंजीव व पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नामदेव ताकवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती गोविंदबाग येथे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

            भाजपच्या निष्ठावतांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तर पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम दौंड तालुक्यातील यवत येथे १५ एप्रिल २०२४ रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. भाजप पक्षाला हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का मानला जात आहे.

            देशात इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर १९७८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यातून जनता पक्षाचे उमेदवार राजाराम ताकवणे विजयी झाले होते. या माजी आमदारांचे चिरंजीव नामदेव ताकवणे १९९० पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभागी होते. त्यानंतर त्यांची १९९९ साली भारतीय जनता पक्षाच्या दौंड तालुका सरचिटणीसपदी निवड झाली.

           २००२ साली भाजपचा उमेदवार म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचा थोड्या मताने पराभव झाला. २००२ ते २००७ दरम्यान तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम केले. तर २०१० ते २०१६ असे सहा वर्ष भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

             २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचाराची धुरा भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी त्यावेळी जानकर यांना दौंड तालुक्यातून २७ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते.

            मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाला सुटल्याने त्यांची संधी हुकली. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर नामदेव ताकवणे यांना २०१४ ते २०१९ या कालावधीत पुणे जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

        त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रासपचे आमदार असलेले राहुल कुल यांनी भाजपमधून विधानसभेची निवडणूक लढून विजयी झाले. त्यानंतर ताकवणे पक्षापासून बाजूला पडले. आमदार राहुल कुल यांच्या ताब्यातील भीमा सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेने २५ वर्षाच्या करारावर भाडेतत्त्वावर चालवण्यास दिल्यानंतर ताकवणे यांनी सहकार बचाव समितीच्या माध्यमातून कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास विरोध केला. यासंदर्भात न्यायालय दाद मागितली. शासनाकडे व इडीकडे कागदपत्रे सादर केली.

         त्यांनी दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांचे सहकारी घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची वरवंड येथे सभा घेऊन भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराबाबत संचालक मंडळावर ५०० कोटीच्या मनी लॉन्ड्रीचा आरोप केला. कारखान्याच्या चौकशी संदर्भात भाजपच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली नाही.

          तर राष्ट्रवादीचे अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्याने दौंड तालुक्यातील त्यांचे समर्थक माजी आमदार रमेश थोरात व भाजपचे आमदार राहुल कुल लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी एकत्र आल्याने कारखान्याच्या लढाईत भाजपच्या वरिष्ठांकडून व अजित पवार यांचे समर्थक रमेश थोरात यांच्याकडून मदत होणार नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे नामदेव ताकवणे यांनी सांगितले.