दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- समाजसेवा आणि वारकरी परंपरेच्या मूल्यांचा संगम जपत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांच्या वतीने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली.
ही मदत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्त करण्यात आली. संस्थेच्या वतीने अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे, खजिनदार भालचंद्र नलावडे, मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे, तसेच विश्वस्त आसाराम महाराज बडे, शिवाजी महाराज काळे आणि तुकाराम मुळे उपस्थित होते.
संस्थेने वारकरी परंपरेप्रमाणे “सेवा हीच साधना” या तत्वाला अनुसरून पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी ही आर्थिक मदत उपयोगी पडणार आहे. या उपक्रमाद्वारे संस्थेने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी आणि वारकरी दायित्व जपत समाजसेवेचा उत्तम आदर्श निर्माण केला आहे. संस्थेच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



