दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पंढरपूर : आषाढी वारीचा सोहळा म्हणजे भक्ती, परंपरा आणि प्रेम यांचा अविभाज्य संगम. या सोहळ्याच्या निमित्ताने एक हृदयस्पर्शी परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावात पंढरपूरच्या पवित्र भूमीत पार पडली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माउली संस्थान, आळंदी यांच्या वतीने संत मुक्ताई मातेस साडीचोळी अर्पण करण्यात आली.
पंढरपूर येथील श्री संत मुक्ताबाई मठात त्रयोदशीच्या दिवशी दरवर्षी जपली जाणारी ही परंपरा यंदाही विशेष भक्तिभावात पार पडली. पुन्हा एकदा ‘माउली’ने त्यांच्या लाडक्या बहिणीस स्नेहाचा सुवास अर्पण केला आणि उपस्थित भाविकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
यंदाच्या पूजाविधीचे नेतृत्व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांनी केले. त्यांच्या हस्ते संत मुक्ताई मातेस महापूजा व अभिषेक घालण्यात आला. यावेळी भैय्यासाहेब रवींद्र पाटील, रवींद्र महाराज हरणे, शंकरराव पाटील, उद्धव महाराज जुनारे, ज्ञानेश्वर हरणे आणि शेकडो वारकरी व सेवेकरी उपस्थित होते.
या पूजेनंतर माउलीकडून मुक्ताईस अर्पण करण्यात आलेली साडीचोळी ही एक प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि बंधुतेचा अमूल्य वारसा आहे. याच साडीचोळीचा मुक्ताई दिवाळीच्या भाऊबीजेला परिधान करतात, ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जाते. संत सोपानकाका व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी भेटीप्रमाणेच मुक्ताई-माउली यांचा हा सोहळा एक अद्वितीय भावनिक अनुभव देणारा असतो. फुलांनी सजलेली जागा, भजनांचा गजर, पूजाविधीतून वाहणारी निष्ठा आणि त्या साडीचोळीच्या अर्पणावेळी उपस्थित भाविकांच्या नजरेतील ओल हे सर्व वातावरण भक्तीमय करत होते.
“माउली आणि मुक्ताई यांचं नातं केवळ रक्ताचं नाही, ते आत्म्याचं आहे… आणि त्या नात्यात भावविश्व सामावलेलं आहे,” असे एक जेष्ठ वारकरी कंठावर आलं पुसत म्हणाले. या सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी संप्रदायातील एक अमूल्य परंपरा पुढच्या पिढीकडे पोहोचवली जाते आहे. प्रेम, भक्ती, आणि कृतज्ञता यांची संगती साधणारा हा पूजासोहळा ‘वारी’च्या भक्तिपर्वाला एक वेगळीच उंची देतो.



