शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलि (WCL) अंतर्गत ओव्हर बर्डन काढण्याचे कंत्राट घेतलेल्या KVRR कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध आता ‘ठेका कामगार युनियन (HMS)’ आक्रमक झाली आहे.आज ७ मे २०२६ रोजी युनियनचे केंद्रीय महामंत्री शंकर खत्री यांनी कंपनी प्रशासनाला आंदोलनाचे नोटीस बजावत इशारा दिला आहे की,जर स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगारात प्राधान्य दिले नाही,तर १८ मे पासून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
याप्रसंगी वर्धा व्हॅलीचे महामंत्री सचिन भोयर,कोयला श्रमिक सभेचे महामंत्री संजय मिसलवार,संजय कांबळे,नितीन गौरकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
KVRR कंपनीने ऑगस्ट २०२५ पासून वेकोलिमध्ये काम सुरू केले आहे.मात्र,कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना कामावर न घेता झारखंड,ओडिशा,बिहार,तेलंगणा आणि मध्य प्रदेशातून ३०० हून अधिक कामगारांना येथे आणले आहे.या परप्रांतीय कामगारांची अवस्था अत्यंत दयनीय असून,त्यांना अक्षरशः ‘बंधुआ मजूर’ म्हणून मेंढरांसारखे ठेवण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप युनियनने केला आहे.
कामाच्या ठिकाणी ना प्रथमोपचाराची सोय आहे,ना रुग्णवाहिकेची व्यवस्था,अशा प्रकारे कामगारांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे चित्र सध्या तिथे दिसत आहे.
विशेष म्हणजे,राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता आणि तो मान्यही करण्यात आला होता.कायद्यानुसार स्थानिकांना रोजगार देणे अनिवार्य असतानाही कंपनी प्रशासन या नियमांना हरताळ फासत आपली मनमानी चालवत आहे.
या अन्यायाविरुद्ध आता संघर्षाची भूमिका घेण्यात आली असून,जर तातडीने स्थानिकांच्या रोजगारावर निर्णय झाला नाही,तर होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी कंपनी व्यवस्थापन जबाबदार असेल, असा सज्जड दम शंकर खत्री यांनी दिला आहे.



