Home देशविदेश धर्म, संस्कृती आणि स्वातंत्र्य…

धर्म, संस्कृती आणि स्वातंत्र्य…

          प्रत्येक धर्माचे मूळ हे ईश्वर नाही,परंतु बहुतांशी धर्माचे मूळ हे ईश्वरच आहे,याचा अर्थ धर्माची उत्पत्ती ईश्वर आहे,म्हणजेच एकाच बापाची अनेक अपत्य,मुले म्हणजे विविध धर्म असा त्याचा अर्थ होतो.

     प्रत्येक धर्माचे आचरण सारखेच नाही,म्हणजेच संस्कृती एक नाही,म्हणजेच धर्मानुसार संस्कृती आहे.याचा अर्थ धर्म अनेक म्हणून संस्कृती पण अलग अलग आहेत.हे अलगपण का ? याचे कारण इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत , म्हणजेच आपले वेगळेपण दाखविणे म्हणजेच आपली ओळख देण्याची ही एक प्रथा म्हणजेच संस्कृती होय.

            म्हणूनच धर्मानुसार पोशाख,प्रार्थना,आराधना,पूजापाठ,मंत्र तंत्र,तीर्थस्थान, पोथी पुराण,ग्रंथ , खानपान, रुढी,परंपरा,चालीरीती, सण वार हे त्या त्या धर्माच्या अलग अलग दिसतात,याचाच अर्थ धर्म अलग म्हणून संस्कृती पण अलग अलग दिसतात.

    धर्मातील समाजाचे नियंत्रण करण्याचे काम हा धर्म करत असतो,ती नियमावली म्हणजेच संस्कृती होय.संस्कृती म्हणजे एक प्रकारचे धर्माचे बंधनच होय.ते बंधन ( संस्कृती ) नाही पाळली तर त्या त्या धर्मातील समाजाच्या व्यक्तीस धर्माच्या बाहेर केल्या जाते,म्हणजे त्यावर बहिष्कार टाकल्या जातो,म्हणून बरीच माणसे भीतीपोटी धर्माचे नियम पाळतात,संस्कृती पाळतात,बहिष्कार म्हणजे रोटी आणि बेटी बंदी केल्या जाते,म्हणून माणसाचा नाईलाज होतो.खरे तर असे धर्माचे वागणे म्हणजे सत्य न्याय निती सोडणेच होय.

           तरी पण त्या त्या धर्मातील लोकांची मानसिकता तशी बनल्या मुळे प्रत्येकजण आपापल्या धर्माचा आणि संस्कृतीचा गुलाम बनलेला आहे.धर्म आणि संस्कृतीच्या पिंजऱ्यात प्रत्येक व्यक्ती,नागरिक बंदिस्त आहे.” चल उड जा रे पंछी, अब तुझे तेरे घर जाना है ” म्हणून संविधानाने धर्म आणि संस्कृतीचे स्वातंत्र्य देऊन धर्माच्या पिंजऱ्यातून मुक्त करण्याचा कायदा केला आहे.स्वातंत्र्य दिले आहे,याचा अर्थ पिंजऱ्याचे दार उघडले आहे,तरी पण पिंजऱ्यातील पोपटाला पिंजऱ्याची एव्हडी सवय झाली आहे,की दिवसभर कुठेही मोकळ्या वातावरणात फिरला तरी तो पोपट परत पिंजऱ्यातच येऊन बसतो, तेच सडके अन्न खातो.

           अशीच काहीशी नव्हे तर बरीचशी सवय भारतीय जनतेस जडली आहे.कारण स्वतंत्र भारताच्या संविधानाची सवय अजून होत नाही,त्याचे कारण भारतीयांची गुलामीत राहण्याची परंपरा ही 16 वी शतका पासुनची आहे,शिवाजी महाराजांच्या स्वराज्यानंतर आणि त्या आधी पण हिंदुराजे,मुस्लिमराजे,ख्रिचनराजे या सर्वांचे मिळून ची हजार वर्ष हुकूमशाहीच्या पिंजऱ्यात राहण्याची सवय जडली आहे,आपल्या पूर्वजांच्या रक्तातील ही गुलामी जाण्यास अजूनही तयार नाही.

           राजकीय स्वातंत्र्य ,मतदानाचे स्वातंत्र्य,आपणच आपला राजा व्हायचे,निवडायचे स्वातंत्र्य मिळूनही परत आपली वाटचाल गुलामीकडेच चालू आहे,आपापल्या धर्माच्या जातीच्या संस्कृतीच्या बंधनामुळे.धर्म आणि संस्कृती चे स्वातंत्र्य पाळायचे ,किंवा त्याचा त्याग करायचे स्वातंत्र्य मिळाले,या पैकी धर्म संसंस्कृती पाळायचीच,पण ती सोडायची नाही,अशा गुलामीच्या मानसिकतेत आपण आपले स्वातंत्र्य गमावत आहोत,याचे भान आपणास होताना दिसत नाही.

             संविधानाने आपणास धर्म आणि संस्कृती चे गुलामीत राहण्याचे आणि बाहेर पडण्याचे हे दोन्ही पर्याय आपल्या पुढे ठेवले आहेत,त्यापैकी गुलामी की स्वातंत्र्य निवडायचे हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे,पण भारतीय माणसावर धर्म आणि संस्कृतीचा एवढा पगडा फीट बसलाय की,तो पिंजऱ्यातून बाहेर येण्यास तयारच नाही.

           भारतीय संस्कृती म्हणजे केवळ वैदिक,केवळ हिंदू,केवळ जैन शीख ख्रिचन, मुस्लिमच राहिलेली नसून 15 ऑगस्ट 1947 पासून भारतीय संस्कृती म्हणजेच ” विविधतेत एकता ” ची संस्कृती झाली आहे,भारतीय संस्कृती ही केवळ धार्मिक संस्कृती राहिली नाही ,तर ती राष्ट्रीय संस्कृतीचे रूप धारण केले आहे.

          आता कुणीही भारतीय नागरिक कोणत्याही धर्माच्याच्या संस्कृतीचे पालन केंव्हाही करू शकतो,हिंदू माजीद मधे जाऊन नमाज पडू शकतो,चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करू शकतो,विहार,गुरुद्वारा कोणतेही देऊळ,कुठेही रानावनात,उघड्यावर जाऊन पण ईश्वराची आराधना करू शकतो,विहार मध्ये मात्र ईश्वराची नसून बुद्धाची आराधना करू शकतो,याचा अर्थ कोणत्याही धर्माचा माणूस कोणत्याही धर्माचा देव आणि संस्कृती फॉलो करू शकतो,अशा वर्तनाने कोणताही धर्म त्यास धर्मातून बहिष्कृत करू शकत नाही.धर्माच्या या बेड्या संविधानाने तोडल्या आहेत.आता आपणास पिंजऱ्यात राहायचे की आपल्या मानवी मूल्यांच्या हक्काचे आकाशात उंच भरारी घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

    लेखक : दत्ताभाऊ तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक 8 एप्रिल 2025.फोन : 9420912209.