Home Social श्री ज्ञानेश्वर विद्यालयात वाहतूक जागृती अभियान, विद्यार्थ्यांना पोलीस विभागाचे मोलाचे मार्गदर्शन…

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात वाहतूक जागृती अभियान, विद्यार्थ्यांना पोलीस विभागाचे मोलाचे मार्गदर्शन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी देवाची येथे “वाहतूक जागृती अभियान” अंतर्गत एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढत्या दळणवळण आणि त्यासोबत येणाऱ्या अपघातांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, आळंदी-दिघी पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

          या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर (आळंदी-दिघी पोलीस स्टेशन) यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी वाहतुकीचे नियम, वाहतूक शिस्तीचे महत्त्व, हेल्मेटचा अनिवार्य वापर, तसेच फोस्को कायदा व ऑनलाइन खरेदी-विक्रीमधील धोके आणि फायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या आयुष्यात या बाबींची योग्य अंमलबजावणी कशी करावी यावर त्यांनी विशेष भर दिला.

         तसेच आपत्कालीन परिस्थितीत 112 नंबर कसा उपयोगी ठरतो याची माहिती देत, पोलीस मदतीसाठी हा नंबर सर्वांनी लक्षात ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या मनातील कायद्याविषयीचे गैरसमज व संभ्रम दूर करत, कायद्याचे महत्त्व आणि त्याचे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम स्पष्ट करण्यात आले.

        कार्यक्रमावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, ट्राफिक पोलीस सीमा अंगारे, दादासाहेब नाळे, राजाभाऊ पानगावकर, इम्रान शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे यांनी केले.

        या उपक्रमाचे औचित्य साधत पोलीस विभागाच्या वतीने विद्यालयाच्या ग्रंथालयास १०० पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरतील, असे मत शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. याबद्दल पोलीस प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये कायद्या-विषयक जागरूकता आणि सुरक्षिततेबद्दलची समज वाढविणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.