रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर :- आपल्या जीवाची पर्वा न करता पुरात वाहून गेलेल्या नागरिकांना वाचविणाऱ्या चिमूर तालुक्यातील सुभाष डहारे आणि बाळू झोडे यांना वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने त्यांच्या जिगरबाज कार्यासाठी जाहीर केलेला शहिद बालाजी रायपुरकर विरता पुरस्कार ऑगस्ट क्रांतीदिनी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
सन्मानचिन्ह,सन्मानपत्र आणि १००० रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सदाशिवराव मेश्राम राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार श्रीधर राजमाने,पोलीस निरीक्षक संतोष बाकल,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम,गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.भूपेश पाटील उपस्थित राहणार आहेत.
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे नेरी सिरपूर मार्गावरील नाल्यावर असलेल्या पुलाच्या पाण्याची तीव्रता लक्षात न आल्याने चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी पाण्याच्या प्रवाहात मोटारसायकलसह वाहून गेले.
जीव वाचवण्यासाठी दोघेही टाहो फोडत होते.पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असल्याने अनेकांची हिम्मत झाली नाही.अशात सुभाष डहारे आणि बाळू झोडे या दोघांनी मोठ्या हिंमतीने आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पुरात वाहून गेलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.
सुभाष डहारे आणि बाळू झोडे या दोन जिगरबाज व्यक्तींच्या हिंमतीमुळे त्या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले.पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना बोथली येथील युवकांनी पुरातून बाहेर काढले.त्यांनाही या समारंभात गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे,उपाध्यक्ष डॉ.मोहन येंडे,डॉ.दीपक गणवीर,नितीन पाटील,हरी मेश्राम,रावन शेरकुरे,रामदास कामडी,कैलाश बोरकर,प्रकाश कोडापे,प्रकाश मेश्राम,मनोज राऊत,आकाश भगत आदींनी केले आहे.