दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज तसेच सासवड येथील संत सोपानदेव पालखी सोहळ्यांच्या मार्गावरील सुविधा, रस्ते व मुक्कामस्थळांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सविस्तर आढावा घेतला. यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी कितपत झाली, याचीही तपासणी करण्यात आली.
आळंदी येथील दर्शनबारीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. तसेच ‘भक्ती सोपान’ पुलाची उंची ‘स्काय वॉक’प्रमाणे वाढविण्याचा प्रस्तावही चर्चेत आला. आळंदी ते पिंपरी-चिंचवड हद्दीपर्यंतच्या सुमारे ७०० मीटर रस्त्यापैकी उर्वरित १०० मीटरचे रुंदीकरण लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली.
निरा नदीत पालखी आगमनाच्या दोन दिवस आधी पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या. संत सोपानदेव पालखी सोहळ्यासाठी पोलीस बंदोबस्त, पाणीपुरवठा व स्वच्छता यांचे अधिक नियोजनबद्ध नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले.
दिवे घाट परिसरात वारीदरम्यान बॅरेकेटिंग व रस्त्यालगत विजेची सोय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत केली जाणार आहे.
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज संस्थानांना प्रत्येकी एक स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. आळंदी येथील दर्शनबारी परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने सुमारे १८० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
सासवड येथील भुजबळ हॉटेल परिसरातील खड्डा भरण्याचे काम प्रगतिपथावर असून ते लवकर पूर्ण होणार असल्याने पालखी मार्ग सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाहतूक व सुरक्षा व्यवस्थापनासाठी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, “पालखी सोहळा हा जगातील सर्वात शिस्तबद्ध धार्मिक सोहळा असून वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.” बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच देहू, आळंदी व संत सोपानदेव संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.



