रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय,वडाळा (पैकू), ता.चिमूर येथील दिव्यांग मूकबधिर विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक,सामाजिक,भावनिक व नैतिक सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आली होती.
सहलीच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन,चिमूर येथे भेट दिली.यावेळी पोलीस स्टेशनमधील तक्रार नोंदणी प्रक्रिया,सायबर गुन्हे विभाग,शस्त्रागार,तुरुंग व्यवस्था,तसेच पोलिसांचे कार्य याची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व पथनाट्यातून सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत समाज प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला.ठाणेदार दिनेश लबडे व एस.डी.पी.ओ.दिनकर ठोसर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून उपस्थित अधिकारी व कर्मचारी भारावून गेले.यावेळी लहान विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला.
यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गरडापार येथे भेट दिली.
या भेटीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शाळेची शैक्षणिक पद्धत,अध्ययन–अध्यापन प्रक्रिया,शैक्षणिक साधनसामग्री व भौतिक सुविधा यांची माहिती मिळाली.सामान्य विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत मूकबधिर विद्यार्थ्यांनी सामाजिक समावेशन व समानतेचा अनुभव घेतला.त्यानंतर दिव्य वंदना आधार फाउंडेशन, पुनर्वसन केंद्र,जामगाव (कोमटी) येथे भेट देण्यात आली.
येथे मनोरुग्ण,बेघर व उपेक्षित घटकांनी आपली कला सादर केली.तसेच मूकबधिर व सामान्य शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य व गीतांच्या माध्यमातून बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
तसेच यावेळी मूकबधिर विद्यालय कडून भोजनदान करण्यात आले तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते बेघर निराशेत लोकांना बिस्कीटचे वाटप केले या प्रसंगी मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक श्री.कामडी सर व गरडापार शाळेच्या शिक्षिका सौ. कल्पना महाकारकर यांचा संस्थापक अध्यक्ष श्री.शुभम प्रसारकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक भान,करुणा,सहानुभूती,नैतिक मूल्ये व सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचे प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.
ही सहल यशस्वी होण्यासाठी मूकबधिर विद्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



