शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
मौजा शंकरपूर (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथे आधारभूत धान नोंदणी केंद्र सुरु करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती उपसरपंच अशोक चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,मौजा शंकरपूर,तालुका चिमूर,जिल्हा चंद्रपूर परिसरातील शेतकरी बांधवांना धान खरेदीसाठी केंद्र अनेक किलोमीटर अंतरावर असल्याने अत्यंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वाहतूक खर्च,श्रम,वेळेचा अपव्यय आणि वारंवार होणारी गैरसोय यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसत आहेत.
शंकरपूरसह परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर धान उत्पादन होत असून,येथील शेतकरी दरवर्षी शासनाच्या हमीभाव योजनेवर अवलंबून असतात.परंतु मौजा शंकरपूर येथे आधारभूत धान नोंदणी केंद्र नसल्याने खालील गंभीर अडचणी निर्माण होत आहेत :
1. धान वाहतुकीसाठी जास्त अंतर,त्यामुळे वाढलेला खर्च.
2. वाहनांची उपलब्धता कमी,अनेकदा रांगा व प्रतीक्षा.
3. धान नासाडीचा धोका,विशेषतः पावसाळी वातावरणात.
4. ज्येष्ठ,लघु व सीमांत शेतकऱ्यांना अतिरिक्त त्रास.
वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता,शंकरपूर येथे स्वतंत्र आधारभूत धान नोंदणी केंद्र सुरु करणे अत्यावश्यक आहे असे उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे.
येथील ग्रामपंचायत,स्थानिक शेतकरी,तसेच कृषी सहकारी संस्था यांच्याकडे आवश्यक निवारा,जागा आणि सहकार्य उपलब्ध करून देण्याची तयारी आहे.
म्हणून उपसरपंच अशोक चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना विनम्र विनंती केली की,मौजा शंकरपुर येथे तत्काळ आधारभूत धान नोंदणी केंद्र सुरु करण्याचे आदेश संबंधित प्राधिकारी यांना देण्यात यावेत.
निवेदनाच्या प्रती प्रधान सचिव,(कृषी विभाग / विपणन विभाग / संबंधित प्राधिकरण) मंत्रालय, मुंबई- ४०००३२,यांना पाठविण्यात आली आहे.



