पारु गं पारु, कुठला पॅक मारु ?.. देशी, इंग्लिश की मोहाची दारु…! — आरमोरी शहरात अवैध दारुविक्रेते तुपाशी…पिणाऱ्याची बायको लेकरं मात्र उपाशी..!

 प्रितम जनबंधु

    संपादक 

           आदिवासी बाहुल्य गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दारुच्या नशेत गुंग करु अप्रगत करुन ठेवण्याचा विळा कुणी उचलाय? व ठेका कुणी घेतलाय? हे गुलदस्त्यातील कोडे असले तरी समाजातील मुळ घटकांना बरबाद करणेवाल्या अवैध व्यवसायिकाकडे दुर्लक्ष करायचं यासाठी प्रशासकीय यंत्रणा आहे काय?हा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील तथा आरमोरी शहरातील नागरिकांना पडला आहे.

          याचबरोबर गडचिरोली जिल्हातंर्गत छोटेकालीन धंदेवाल्यावर केविलवाणी कारवाई केली जाते. पण मुख्य दारुमाफीया मात्र मोकाटपने वावरताना दिसतो. मग आरमोरी शहरात व तालुक्यात दारुचा पुरवठा करणारा मोठा डिलर, दारू विक्री करणारे मोठे अवैध व्यवसायिक हे संबंधित यंत्रणेच्या नजरेआड कसे काय आहेत? हेच कळायला मार्ग नाही.

                  आरमोरी तालुकातंर्गत दारुच्या महा व्यवसायात युवावर्ग व्यसनाधीन बनत चालला आहे. दारुच्या व्यसनामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे पावलोपावली जाणवत असुन अनेक तळीरामांना आपला जीव गमावावा लागला असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. 

          आरमोरी शहरात दिवसाढवळ्या सुरु असलेले देशी, विदेशी, इंग्लिश दारुचे अवैद्य व्यवसाय जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक व स्थानीक पोलिसांच्या नजरेस अजिबात पडत नाही का? त्याकडे त्यांचे लक्ष जात नाही का? एखाद्याने या विषयी तक्रार केली तर त्यालाच उलट्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरीक या विषयापासुन चार हात लांब राहणेच पसंद करत आहेत. अवैध धंद्याविरोधात कारवाईबाबत पोलीस खात्याची भुमिका संशयास्पद असल्याने जनतेने भरवसा ठेवायचा कोणावर..? असा सुर सध्या नागरिकांमधून निघत आहे.

           पोलिसांनी मनावर घेतल्यास एक तासात आरमोरी शहरातील सर्व अवैद्य धंदे हद्दपार होऊ शकतील. परंतु कडक कारवाईची भुमिका पोलिस खात्याने स्विकारने गरजेचे आहे. त्या विषयी पोलिसखाते ठाम असणे गरजेचे आहे. परंतु पोलिस खात्याकडुन अशा अवैध धंदेवाल्यावर कारवाई का केली जात नाही…? पोलिस खाते सुद्धा या मद्यसम्राटांना घाबरत आहे की काय..? अशी चर्चा सध्या शहरात रंगत असुन नक्की कुणाच्या आशिर्वादाने हे काळे धंदे अगदिच राजरोसपने, खुलेआम व बेधडक सुरू आहेत याचा उलगडा जनतेला होणे गरजेचे आहे.

          या अवैध धंद्यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अनेक तळीराम कधी चौकातच तर कधी रस्त्याच्या कडेला “तल्लु” होऊन पडुन असल्याचे दिसुन येत आहे. शहरातील चौकाचौकात खुलेआम होणारी मद्यवीक्री ही शहरवासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याने अशा या अवैध व्यवसायाला खुलेआम पाठबळ कुणाचे…? कुणाच्या आशिर्वादाने हे अवैध धंदे आरमोरी शहरात खुलेआम व राजरोसपपणे चालु आहेत…? यांच्या मागचे बोलविते धणी कोण आहेत…? याची सखोल चौकशी वरीष्ठ स्तरावरून होणे गरजेचे असल्याने जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, आरमोरी स्थानिक पोलिस, यांनी पथकामार्फत कारवाईचा फास आवळल्यास गडचीरोली जिल्ह्यात व आरमोरी शहरातील अवैध व्यवसायाला कायमचा लगाम बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबधीत प्रशासनाने लक्ष देणे अगदीच गरजेचे झाले आहे. तर आणी तरच शहरातील शातता व सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होईल. 

         या अवैध व्यवसायाला मोठा राजाश्रय असल्याशिवाय हे असे धंदे शहरात फोफावणे शक्य नाही. शहरातील दारुमाफीया काही तकलादु अधिकारी यांना हाताशी धरून अवैध मद्यविक्री करुन शहरातिल युवकाना व्यसनाधीन बनवत वाम मार्गाला लावण्याचे काम करत असून अशा मद्यसम्राटांवर पोलिसांचा कायमचा अंकुश असणे गरजेचे आहे. जेणे करून आरमोरी शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था राखणे शक्य होईल. व शहरामध्ये शांततामय वातावरण राहील तद्वतच शहरातील युवावर्ग व्यसनाधीनता सारख्या वाममार्गाला लागण्यापेक्षा चांगल्या मार्गाने व्यवसायाच्या नादी लागेल आणी गावागावात शांतता नांदेल एवढीच जणसामान्य ची अपेक्षा आहे.