शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
अमाप खर्च आणि डीजेच्या कल्लोळात पार पडणाऱ्या आजच्या लग्नसोहळ्यांच्या काळात,वरोरा तालुक्यातील पेवरा येथील एका नवदांपत्याने समाजाला नवी दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे.
या नव दांपत्याने आपला विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने आणि समाजाभिमुख विवाह सोहळा दिनांक 3/5/2026 ला पार पाडला.
दुसऱ्या दिवशी रिसेप्शन टाळून सतीश पंधरी जिवंतोडे ( महाराष्ट्र पोलीस )आणि ममता मनोहर मानकर यांनी अनावश्यक खर्च टाळून गावात चक्क विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी “सावित्रीबाई फुले वाचनालय” उभारले!.

वरोरा तालुक्यातील पेवरा येथील सतीश पंधरी जिवंतोडे आणि ममता मनोहर नामकर यांचा विवाह दिनांक २ मे २०२६,शनिवारी रोजी अत्यंत साधेपणात संपन्न झाला.या विवाहाने केवळ दोन कुटुंबांना नव्हे,तर संपूर्ण समाजाला एक नवा आदर्श घालून दिला आहे.हा विवाह हुंडा मुक्त पद्धतीने करण्यात आला.
आजच्या काळात अनेक ठिकाणी हुंडा प्रथेचे सावट कायम असताना,या दांपत्याने घेतलेला हा निर्णय सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा आहे.
या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश जाऊन इतर तरुणांनी अशा उपक्रमांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळणार आहे.विवाह सोहळ्यात मिळालेली रक्कम त्यांनी स्वतःसाठी न वापरता “मॅजिक ”या समाजोपयोगी उपक्रमाला देण्याचे ठरवले.
विशेष म्हणजे नववधू सतीश जिवंतोडे हा “मॅजिक” उपक्रमाचा पहिला तुकडीचा विद्यार्थी होता.या उपक्रमातुन त्याला मिळालेल्या शिक्षण व स्पर्धेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून त्याने टीका लावणीचे मिळालेले २० हजार रुपयांची मदत मॅजिकला केली.ही कृती कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
तिसरे आणि सर्वाधिक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे,पारंपरिक स्वागत समारंभ (रिसेप्शन) न करता,फटाक्यांची आतषबाजी व बँडबाजाचा खर्च टाळून त्या रकमेचा गावातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी,“सावित्रीबाई फुले वाचनालय” उभारणीसाठी वापर करण्यात आला.या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
विशेषतः नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व विविध शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार असून,त्यासाठी आवश्यक पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.याशिवाय,विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी विविध प्रकारची पुस्तके या वाचनालयात ठेवण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्याची उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.या उपक्रमात नववधूच्या कुटुंबीयांनीही सहकार्य केले असून,सतीश यांचे भाऊ विशाल पंधरी जिवंतोडे व वधू ममता नामकर यांनीही महत्त्वाचा पुढाकार घेतला.
या वाचनालयाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काकडे व सरपंच वंदना पंधरी जिवंतोडे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना,“आजच्या तरुण पिढीने समाजासाठी काहीतरी देण्याची भूमिका घेतल्यास समाजात नक्कीच नवे बदल घडतील,” असे मत व्यक्त केले.
यावेळी सतीशचे आई वडील माला व पंधरी जिवंतोडे,तसेच ममताचे आई आशाबाई मानकर,काका रवींद्र जिवंतोडे,ब्राईटन फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे,नेचर फॉउंडेशन चे संचालक निलेश ननावरे,प्रदीप घरत,नातेवाईक मित्रमंडळ गावकरी आणि गावातील विद्यार्थी उपस्थित होते.
सतीश आणि ममता यांच्या या उपक्रमामुळे विवाह सोहळ्याचा खर्च कमी करून तो समाजाच्या हितासाठी कसा वापरता येऊ शकतो,याचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर आले आहे.त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक परिवर्तनाची नवी दिशा मिळेल,यात शंका नाही.



