ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- शहरातील गणेश वार्ड येथे शनिवारी पोलीसांनी शस्त्र बाळगून दहशत माजवित असलेल्या दोन आरोपींकडून मोठा शस्त्रसाठा व दारूच्या शिश्या जप्त करून दोन्ही ओडीशा येथील आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई श्रीराम नवमीच्या आदल्या दिवशी पोलीस निरीक्षक एम.पी.आचरेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वानखेडे यांनी केली असून या दोन्ही वादग्रस्त व्यक्तींमुळे नागरीक कमालीचे त्रस्त झाले होते असे प्रभागातील जनतेने सांगितले.
जूने पोलीस ठाणे, पंचायत समिती बाजूला स्व. गोपालदास गंगाराम अग्रवाल यांच्या घरी रवि. ०५ ला दू. ११:३० दरम्यान जावई रूपेश चांडक ३५ रा. ब्रम्हपुरी हे आले असता. तेथे राहणारे अशोक मालीराम अग्रवाल वय ६४ व दिनेश मालीराम अग्रवाल वय ४४ मुळगाव रा. बेटनोटी, तह. छनबडीया जिल्हा मयुरभंज ( ओडीशा ) यांनी वादविवाद घालित शस्त्र बाळगून दहशत निर्माण केली. तातडीने साकोली पोलीसांना याची माहिती देण्यात आली.
पोलीस निरीक्षक एम.पी.आचरेकर यांनी तात्काळ सहा. पोलीस निरीक्षक दिपक वानखेडे यांना तेथे पाचारण केले. पोलीसांनी त्यांच्या रूममध्ये झडती घेतली असता तिथून सहा ते सात घातक ( तलवार, चाकु, गुप्ती, कोयता ) अवजारे व असंख्य दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. ही कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. वृत्त लिहेपर्यंत रात्री ०८ ला पोलीस ठाणे येथे त्यांवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची कारवाई सुरू होती.
विशेष म्हणजे गणेश वार्ड प्रभागात या दोन्ही “रंगा बिल्ला” या टोपण नावाने ओळखले जाणा-या दोन्ही भावंडांची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. वारंवार रोडवर निघून वादविवाद घालित परीसरातील शांतता भंग करणे. किरायादारांना धमक्या देऊन पैसे उकळणे. या त्रासापायी येथील दोन भाडेकरू याच मानसिक त्रासाला कंटाळून खोली सोडून गेले आहेत.
यांवर यापूर्वीही पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणा-या दोघांवरही कायदेशीर कारवाई करून अश्या आरोपींना हद्दपार करण्यात यावे अशी चर्चा गणेश वार्ड प्रभागात सुरू आहे. आजच्या गंभीर घटनेत पोलीसांनी आरोपींविरुद्ध १९१/२०२५ कलम ४/२५ भारतीय शस्त्र अधिनियम सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला व पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वानखेडे करीत आहेत.



