Home Maharashtra मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाखरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे घेतले दर्शन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाखरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे घेतले दर्शन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

वाखरी – आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाखरी येथे आगमन झाले. या भक्तिमय प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखीचे दर्शन घेऊन माऊलींच्या चरणी नतमस्तक होत विठ्ठलभक्तीत रंगलेला मनोहर अनुभव घेतला.

       मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह पालखी खांद्यावर घेऊन दिंडीमध्ये सहभागी होत वारकऱ्यांच्या उत्साहात भर घातली. टाळ-मृदंगाचा निनाद, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात संपूर्ण वाखरी भक्तिरसात न्हाऊन निघाले.

        या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखने, ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहीणी पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत माऊलींच्या प्रतिमा देऊन केले.

        मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाखरीतील जिल्हा प्रशासनाने भाविक व वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा व सेवांची पाहणी केली. त्यांनी या सुविधांबाबत समाधान व्यक्त करत प्रशासनाचे अभिनंदन केले.

         या भक्तिसोहळ्याला पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह हजारो वारकरी आणि भाविक उपस्थित होते.

        वारकरी संप्रदायाच्या परंपरेला अभिवादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आषाढी वारीच्या अध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकला. “वारी म्हणजे श्रद्धा, शिस्त आणि सेवा यांचा संगम असून, ही आपली महान परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.