Home सांस्कृतिक भावबंधांचा सोहळा : माळशिरस सीमेवर संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव महाराजांची ‘बंधूभेट’…

भावबंधांचा सोहळा : माळशिरस सीमेवर संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव महाराजांची ‘बंधूभेट’…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

वेळपूर – टाळ मृदंगाचा गजर, माउली-माउलीचा जयघोष, भगव्या पताकांनी नटलेले रस्ते आणि भाविकांच्या डोळ्यांतून वाहणारा भावनांचा ओघ… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीच्या वाटेवरील एक अत्यंत भावस्पर्शी आणि ऐतिहासिक क्षण – ‘बंधूभेट’ – बुधवारी (दि. ३ जुलै) पार पडला.

       संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे सख्खे बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या पालख्यांची भव्य भेट माळशिरस आणि पंढरपूरच्या सीमेवरील तोंडले-बोंडले भागात संपन्न झाली. या प्रसंगी हजारो वारकरी भाविकांनी उपस्थित राहून ‘माउली-माउली’चा गजर केला आणि नयनरम्य दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.

        संत सोपानदेव महाराज यांची पालखी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या शेजारी येताच थोडा वेळ रथ थांबवण्यात आला. यावेळी दोन्ही संस्थानांच्या वतीने परस्परांना नारळ आणि प्रसाद देण्यात आला. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून श्रद्धेने आणि भक्तिभावाने जोपासली जाते आहे.

रिंगण सोहळ्याची नेत्रदीपकता…

       यापूर्वी ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने वेळापुर येथून प्रस्थान करून ठाकूरबुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण सादर केले. टाळ, मृदंग आणि फुगड्यांच्या गजरात अश्वांनी गोल रिंगणात तीन फेऱ्या पूर्ण करताच परिसर भक्तिभावात न्हाऊन निघाला.

भावनिक सोहळ्याचे प्रतीक – ‘बंधूभेट’…

       ‘बंधूभेट’ हा फक्त दोन पालख्यांचा मिलन सोहळा नसून, तो दोन भावंडांच्या प्रेमाचा, नात्याच्या बंधाचा आणि वारकरी संप्रदायातील ऐक्याचा साक्षात अनुभव आहे. या भेटीतून वारकऱ्यांमध्ये बंधुभाव, भक्तिभाव आणि परंपरेप्रती निष्ठा अधिकच बळावते. पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करताना हा क्षण संपूर्ण वारीमध्ये एक वेगळाच अध्याय उघडतो. म्हणूनच या ‘बंधूभेटी’स वारकऱ्यांच्या हृदयात अनन्यसाधारण स्थान आहे.