Home देशविदेश वर्धमान महावीर,तथागत गौतम बुद्ध,महात्मा गांधी हरतात का?

वर्धमान महावीर,तथागत गौतम बुद्ध,महात्मा गांधी हरतात का?

        महावीर वर्धमान,तथागत गौतम बुद्ध,महात्मा गांधी हे भारत देशातच जन्मले.यांनी सत्य,शांती,अहिंसा जगाला शिकविली,जगाने ती मान्य पण केली.तरीही जगातील युद्धे थांबली नाहीत,चालूच आहेत.

         एकीकडे सत्य शांती,अहिंसा हे तत्व मूल्य म्हणून मानायचे,त्यांचा स्वीकार करायचा,मानवजातीच्या कल्याणासाठी मानवजात जिवंत राहण्यासाठी हे विचार,हे सिद्धांत,हे तत्वज्ञान,हे मूल्य मान्य करायचे आणि दुसरीकडे व्यवहारात याचे पालन न करता युद्धे करायची,याचा अर्थ या तिन्ही तत्ववेत्यांची हार म्हणावी का? हा प्रश्न पडतो.

        सर्व जग तथागत गौतम बुद्धांना,मा.गांधीना मानते,भारताची ओळख यांच्या नावानेच आहे,आपण जगात कुण्याही देशात गेलो तरी तेथील लोक आपणास भारतीय म्हणजे तथागत बुद्धाच्या व गांधीच्या देशातून आले,असेच म्हणतात.

        धर्म म्हणून जैन,बौद्ध,जगातील काही देशात पसरला,म्हणजेच महावीर,तथागत बुद्ध यांचा विचारच नव्हे तर आचरण पण येथील लोक करू लागले.खुद्द जपान,चीन,व्हिएतनाम,कंबोडिया,श्रीलंका,अशा आणि इतर देशात तथागत बुद्धांच्या विचाराचे पालन केले जाते,बुद्धाच्या मूर्तीपुढे सारे नतमस्तक होतात,तरी पण त्या देशांनी युद्ध करणे सोडले नाही,याचा अर्थ शेवटी युद्धा शिवाय पर्याय नाही,असेच म्हणायचे का? 

      सत्य,न्याय,निती,दया,क्षमा शांती,अहिंसा,ही साऱ्याच धर्माचे तत्व आणि पाया आहे,तरी धर्म मानणारे लोक हिंसेचा मार्ग का अवलंबतात? शेवट पर्यंत अहिंसा का पाळत नाहीत? हिंसेला शरण जाऊ पण हिंसा करणार नाही,युद्धे करणार नाही,असे बौद्ध धर्मीय देश का म्हणत नाहीत?याचा अर्थ हे धर्म पाळत नाहीत,धर्माच्या मार्गाने ( धम्माच्या मार्गाने ) जात नाहीत,असे म्हणायचे का? याचे उत्तर ” हो ” असेल तर धर्माची गरजच काय? असा प्रश्न निर्माण होतो.

        बौद्धच नाही,तर सहिष्णुता हे हिंदुधर्माचे तत्व आहे,पण पाळत नाहीत,म्हणून युद्धाला तयार होतात.बंधुभाव हे इस्लाम धर्माचे तत्व आहे,ते पाळत नाहीत,म्हणून युद्धे करतात,शेजारी जेवल्याशिवाय आपण जेवायचे नाही,आणि सर्वांवरच प्रेम करा,हा संदेश ख्रिश्चनांचा आहे,तरी ते न पाळता युद्धे करतातच,सारेच देश अणुबाँब करण्याच्या मागे लागलेत.

      आपल्याकडे पैसे,तंत्रज्ञान नसेल तर इतर देशाकडून कर्ज घेऊन अणुबाँब बनवित आहेत,ज्यांच्या वापराने yudhh करणाऱ्या दोन देशाचेच नुकसान होते असे नाही तर इतर देशांची पण त्यामुळे वित्त आणि जीविताची हानी होते.

       हिंसेकडून अहिंसेकडे असा प्रवास साऱ्या देशांनी करायचे ठरविले असले तरी व्यवहारात ते पाळत नाहीत,म्हणून परत अहिंसेकडून हिंसेकडे साऱ्याच देशांचा आणि धर्मांचा प्रवास चाललेला आहे.

     एव्हढे मान्य करावे लागेल की,देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था,शांतता राखणे साठी अहिंसेचा वापर होतांना दिसतो.म्हणून प्रत्येक देशात मग ते हुकूमशाहीचे देश असोत की,लोकशाहीचे देश असोत,त्यांचे संविधान आहे,त्यानुसार तेथे कायदे केले जातात,त्यांचे पालन केले जाते,जे कायदा पाळणार नाहीत,त्यांना शिक्षा होते,याचा अर्थ प्रत्येक देशात कायद्याचे राज्य आहे,आणि हे कायद्याचे राज्य अहिंसेचे तत्व स्वीकारल्यामुळेच आहे.

       यामुळे देशांतर्गत अहिंसा पाळल्या जाते,पण जागतिक पातळीवर अहिंसा पाळल्या जात नाही,युद्धे होतात,हिंसा होते,यात कोट्यवधीचे मालमत्तेचे नुकसान होते,सैनिक आणि जनता मिळून लाखो लोक मारल्या जातात.

       म्हणूनच प्रश्न हा पडतो की,महावीर वर्धमान, तथागत गौतम बुद्ध,महात्मा गांधी हरले का? 

         हरले का ? हा प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित केला,याचा अर्थ असा की,हरले का? कुणी म्हणेल नाही,कुणी म्हणेल होय.म्हणजेच देशांतर्गत त्याची जीत झाली आणि दोन देशांच्या सीमेवर मात्र त्यांची हार झाली.असेच या प्रश्नाचे उत्तर आपणास द्यावे लागेल.

         देशांतर्गत सुद्धा अधून मधून हिंसेच्या घटना घडतात,कायद्याच्या राज्याला आव्हान दिल्या जाते,असे का होते? याचे कारण असमानता,विषमता,शोषण,पिळवणूक,अन्याय,अत्याचार, दादागिरी,गुंडगिरी,घराणेशाही आणि सतातंर्गत पदाचा गैरवापर.यामुळे पण देशांतर्गत हिंसा चालूच असते,कायद्याच्या राज्याला ते एक आव्हानच असते,म्हणून देशांतर्गत जनतेचे बंड होतात,आणि सत्ता कोसळते.

      सत्तांतर होते,त्यातून व्यवस्था पण बदलते.हे एक परिवर्तनच असते,क्रांती असते.

      देशांतर्गत क्रांती होऊन सत्ता बदलली,आणि त्या सत्तेने व्यवस्था परिवर्तन नाही केले,तीच व्यवस्था ठेवली,तर परत देशांतर्गत हिंसा घडतच राहतात.

      म्हणून क्रांती होऊन आलेल्या सत्तेने,सत्ताधाऱ्यांनी हिंसा घडणार नाही,अहिंसेचे च राज्य प्रस्थापित झाले पाहिजे,यासाठी विषमतेची पूर्वीची व्यवस्था बदलून समतेची व्यवस्था स्थापन करावी आणि ती टिकेल असेच कायदे करावेत.

      तेंव्हाच देशांतर्गतची हिंसा, गुन्हेगारी नष्ट होईल.आणि तेंव्हाच वर्धमान,बुद्ध,गांधी जिंकले असे होईल.

        लेखक : दत्ता तुमवाड

           सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 2 जून 2025.फोन: 9420912209.