चिचाळा शेतशिवारात वीज पडून एक महिला ठार, तर दोन जखमी… — मृत व जखमी महिलांच्या कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदतीची मागणी…

प्रितम जनबंधु

  संपादक 

         शेतात निंदन काढत असताना अचानक विज पडून एक महिला जागीच ठार तर दोन महिला जखमी झाल्याची घटना रविवारी दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी मुल तालुक्यातील चिचाळा शेतशिवारात दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

                 प्राप्त माहितीनुसार चंद्रकला संजय वैरागडे वय ४५ वर्ष असे मृत महिलेचे नाव असून जखमीमध्ये आशा रविंद्र बुरांडे आणि वंदना मनोज वासेकर यांचा समावेश आहे. जखमींना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

              सकाळी ११ वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होवून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. अर्धा तासांपर्यंत विजांचा कडकडाट सुरूच होता. दरम्यान मुल तालुक्यातील चिचाळा कवडपेठ मार्गावर असलेल्या चंद्रकला संजय वैरागडे यांच्या शेतात सात महिला धान पीकाचे निंदन काढण्याचे काम करीत होत्या. 

                ऐन दुपारच्या प्रहरात १२ ते १ वाजताच्या सुमारास विज कोसळून त्यापैकी चंद्रकला वैरागडे जागीच मृत्यू झाला. तर आशा रविंद्र बुरांडे आणि वंदना मनोज वासेकर या दोन महिला घटनेत जखमी झाल्या आहेत. सुदैवाने का होईना पण अन्य महिला मात्र थोडक्यात बचावल्या आहेत.

           जखमी झालेल्या महिलांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चंद्रकला संजय वैरागडे या अल्पभूधारक शेतकरी होत्या. या घटनेमुळे चिचाळा गावात हळहळ व्यक्त केले जात आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांना आणि जखमी महिलांच्या कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.