स्वयंरोजगार निर्मितीसाठी युवकांनी पुढे यावे- हर्षवर्धन पाटील… – वकीलवस्ती येथे गुळ प्रकल्पास भेट…

 

निरा नरशिहपुर:1 प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार,

               इंदापूर तालुक्यातील युवकांमध्ये कृषी पूरक व विविध प्रकारचे स्वयंरोजगार यशस्वीपणे चालवण्याची क्षमता आहे. त्यामुळे युवकांनी स्वयंरोजगार निर्मितीसाठी धाडसाने पुढे यावे. स्वयंरोजगार निर्मितीसाठी युवकांना अडचणी येतील त्या ठिकाणी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

         इंदापूर तालुक्यातील वकीलवस्ती-सोपान वस्ती येथे युवा उद्योजक ऋतिक जितेंद्र गरुड घोगरे पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या गुळ प्रकल्पास हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी भेट दिली व संवाद साधला.

       हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, या प्रकल्पातून तयार होणाऱ्या सेंद्रिय गूळ, काकवी, गुळ पावडर, मसाला गुळ या उत्पादनांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. शेतकरी कुटुंबातील ऋतिक गरुड घोगरे पाटील या युवकाने बाजारपेठेचा अभ्यास करून सुरू केलेल्या या गुळ प्रकल्पाचे हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक केले. कृषी पूरक स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात आहे, त्याचा लाभ ग्रामीण भागातील युवकांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.

          प्रारंभी प्रगतशील शेतकरी जितेंद्र जालिंदर गरुड घोगरे पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत केले. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, नीरा भीमा कारखान्याचे माजी संचालक धनंजय कोरटकर, रणधीर पाटील, विजयराव घोगरे, प्रतापराव पाटील, हर्षवर्धन घोगरे, कैलास हांगे, विक्रम कोरटकर, जयवंत घोगरे व शेतकरी उपस्थित होते.