“चार महिने झाले!, पि.एम.किसान सन्मान योजनेची १४ वी किस्त व नमो शेतकरी महा सन्मान योजनेची पहिली किस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा टाकणार? — “अल्प आर्थिक मदत,”गवगवा मोठा,केंद्र व राज्य सरकारकडे रुपये नाहीत काय?

 

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

             पी.एम.किसान सन्मान योजनेची १४ किस्त जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र सरकार टाकणार अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित करण्यात येत होत्या व प्रकाशित करण्यात येत आहेत.

           तद्वतच,”नमो शेतकरी महा सन्मान योजनातंर्गत २ हजार रुपयांची पहिली किस्त पी.एम.शेतकरी सन्मान योजनेच्या किस्त बरोबर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करणार असे बातम्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितले जात आहे.

          मात्र,१३ वी किस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती केल्याला ४ महिने झाल्यानंतर सुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यावर पी.एम.शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत १४ व्या किस्तचे रुपये डीबीटी माध्यमातून टाकण्यात आले नाही. 

              शेतकऱ्यांना सहारा,शेतकऱ्यांना मदत,शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी उत्तम योजना असे विविध प्रकारचे चित्र पि.एम.शेतकरी सन्मान योजनेचे रेखाटले जात आहेत.

          आता प्रश्न हा पडतो की,पी.एम.किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ पाचशे रुपये महिना दिला जातो आहे.दर महिन्यातंर्गत पाचशे रुपयाच्या सानुग्रह आर्थिक मदतीला अनुसरून खरोखरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल काय? किंवा उंचावले जात आहे काय?

         ” हं!,पी.एम‌.शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी,”अल्पशी आर्थिक मदत, हा शब्द ठिक आहे‌.

            परंतु,शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पी.एम.शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून अल्पशा आर्थिक मदतीचा गवगवा मात्र प्रशिध्दी माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आहे.

          पि.एम.शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ ५०० रुपये दर महा दिल्या जाणाऱ्या किस्तीचा पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात गवगवा करणे व त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये टाकणे हा प्रकार शेतकऱ्यांसाठी संयुक्तिक व सन्मानजनक आहे काय?यावर विचार करण्याची गरज आहे.

         शेतकऱ्यांच्या पावसाळी हंगामाला जोरदार सुरुवात झाली असताना,त्यांना या हंगामातंर्गत १४ व्या किस्तचे रुपये ४ महिन्यानंतर वेळेवर दिल्या जात नसतील तर याला काय म्हणावे?

            केंद्र सरकारकडे पि.एम.शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत व राज्य सरकारकडे नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वेळेवर देण्यासाठी रुपये नाहीत काय?असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

            केवायसी करण्याच्या सुचना सन २०१९ पासूनच शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत.मात्र केवायसी केल्यानंतर सुध्दा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पी.एम.शेतकरी सन्मान योजनेचे रुपये वळते केल्या जात नसल्याचा किंवा होत नसल्याचा प्रकार सुध्दा सुरू आहे.

           शेतीचा पावसाळी हंगाम जोमाने सुरू असताना,”पी.एम.शेतकरी सन्मान योजनेचे व नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे रुपये, शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र सरकार व राज्य सरकार केव्हा टाकणार?हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.